आता या शब्दांऐवजी मराठी शब्द योजणे अगदीच अशक्य होते का? अजिबात नाही!

मात्र उपरोल्लेखित प्रकारचे लेखन करणाऱ्या सदरहू लेखकासही मनोगतासारख्या शुद्धलेखनानुकूल संकेतस्थळावर आपले विचार मांडावेत असे वाटू लागल्याचे त्यावरून दिसते. ही मराठी शुद्ध लेखन संस्कृतीच्या दृष्टीने प्रगतीच म्हणायला हवी. पूर्वी मायबोलीवर अस्खलित इंग्रजी, रोमनमध्ये सलग पानेच्या पाने लिहीणारे लोक होते. त्यांना प्रथम मायबोलीवर येऊन बोलावेसे वाटू लागले (इंग्रजीत आणि रोमनमध्ये का होईना) ही प्रगती होती. मग मायबोलीवर देवनागरीत लिहा हो! असा ओरडा होऊ लागला कारण मग महेशजींनी तिथे शिवाजी टंकांचा वापर करून मराठीत लिहीण्याची सोय केलेली होती. तिथपासून आज शुद्धिचिकित्सक असणाऱ्या स्थळावर इंग्रजाळलेले लिहीण्याकरता का होईना पण मराठी लिहावे ह्या प्रेरणेपर्यंत झालेली प्रगती, मराठीतील वाढत्या रुचीचेच निदर्शक आहे. तेव्हा हेही नसे थोडके. मात्र सदरहू लेखक महाशयांना ही नम्र विनंती आहे की ह्या चर्चेत काय चालू आहे त्यात किंचित रूची घेऊन संवाद साधावा.