मराठीतून बोलते, मराठीतून लिहिते. समोरच्या अमराठी व्यक्तीने मराठीत बोलावं असा आग्रह धरत नाही. मात्र, त्या अमराठी व्यक्तीने त्याया मातृभाषेतून विचारलेल्या प्रश्नांना मराठीतूनच उत्तर देते. 'इंग्रजी येत नाही का, ' असं कुत्सितपणे विचारणाऱ्या व्यक्तींना 'तुमची मातृभाषा तुम्हाला किती येते? ' असं विचारायला विसरत नाही. हा आगाऊपणा असू शकतो पण महाराष्ट्राची राज्यभाषा आहे मराठी! ती बोलता आली नाही, तरी महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाला आणि महाराष्ट्रात राहण्याचा हट्ट, तसेच गरज असणाऱ्या प्रत्येक अमराठी व्यक्तीने ती शिकली पाहिजे. या लोकांना मराठी बोलता आलं नाही तरी बोललेलं मराठी समजावं इतपत तरी मराठी शिकलंच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. घरात इंग्रजी-मराठी व मराठी-इंग्रजी असे दोन शब्दकोष आहेत. काही इंग्रजी शब्दांना पर्याय म्हणून मराठीत अतिशय सुंदर शब्द सापडतात. पुढच्या वेळेस तो इंग्रजी शब्द वापरण्याऐवजी शोधून काढलेला मराठी शब्द वापरते.