अकबर आणि राणा प्रताप
अकबराचे मूल्यमापन राणा
प्रतापचा विचार केल्याखेरीज पूर्ण होत नाही. मेवाडचा हा महाराणा आपल्या २५
वर्षांच्या करकीर्दीत (१५७२ ते १५९७) बलाढय़ मोगल बादशहाला पुरून उरला. या
संघर्षांत अकबर विजयी झाला, पण प्रताप हरला नाही, बादशहा थकून गेला पण
राणा दमला नाही हे एक विस्मयकारक सत्य आहे. अकबराने चितोड जिंकले (१५६८)
तेव्हा युवराज असलेला प्रताप २७ वर्षांचा होता. मेवाडची युद्धनीती
ठरविण्यात तेव्हापासून त्याचा हात होता. राणा उदयसिंग परिवारासह पहाडात
पळाला. राजपिपलापासून गोगुंधापर्यंत अस्थायी राजधान्या करीत तो फिरत होता.
गोगुंदा येथे उदयसिंगाचा अंत होताच प्रताप सत्तेवर आला तेव्हा अर्धे मेवाड
त्याच्याकडे होते. मेवाड सोडून बहुतेक सर्व राजपूत राजे अकबराने वश करून
घेतले होते. म्हणून मेवाड मोगलांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला. शिवाय
गुजरातच्या वाटेवरील तो काटा होता. तरी अकबराने समेटाचे प्रामाणिक प्रयत्न
केले हेही खरे. प्रतापलासुद्धा शांतता हवी होती. मोगल दरबारात हजर
राहण्यापासून सूट व अंतर्गत स्वातंत्र्य या अटींवर प्रतापही तहास तयार
होता. पण अकबराने ही संधी घालविली.
अकबराने १५७६ ते १५७८ या काळात मेवाडवर पाच स्वाऱ्या केल्या. प्रथम
मानसिंगला धाडले. हळदीघाटची प्रसिद्ध लढाई झाली. प्रताप हरला पण आपल्या
चेतक घोडय़ावर बसून पहाडात नाहीसा झाला. यामुळे त्याची शक्ती व प्रतिष्ठा
कमी झाली नाही. मग अकबराने स्वत: गोगुंदा काबीज केले. पण राणा हाती लागला
नाही. नंतर शाहबाजखानाला पाठविले. तो तीन महिन्यांनी खाली हात परतला.
अब्दुर्रहीम खानेखानच्या स्वारीत त्याचा सर्व परिवार मेवाडींच्या हाती
लागला. तो प्रतापने सन्मानपूर्वक परत पाठविला. अखेर जगन्नाथ कछवाहला
धाडण्यात आले. तो दोन वर्षे मेवाडमध्ये व्यर्थ भटकला. १५७८ नंतर अकबराला
मेवाडकडे लक्ष द्यायला वेळच झाला नाही. एक संघर्ष संपला. प्रतापने १२
वर्षे लढण्यात व उरलेली बारा वर्षे जन्मभूमी व प्रजेच्या विधायक सेवेत
घालविली. मेवाडने पुन्हा समृद्धी व सुखशांती अनुभवली. प्रतापने विपत्तीत
दिवस काढले हा गैरसमज होय. मेवाडच्या संपत्तीचे एक अंशही अकबराच्या हाती
लागला नाही. प्रतापच्या मृत्यूची बातमी कळतांच अकबर आनंदला नाही, खिन्न
होऊन बसला. अखेर प्रतापपुत्र अमरसिंहाने १६१४ साली जहांगिराशी तह केला
तोसुद्धा प्रतापच्याच अटींवर!
वरील माहीती
http://www.loksatta.com/lokprabha/diwali2009/lp03.htm
या लेखातील आहे