मी आळेकरांची महानिर्वाण, महापूर, बेगम बर्वे, शनिवार रविवार ही पूर्ण लांबीची नाटके पाहिलेली आहेत.
भजन, मिकी आणि मेमसाहेब, बसस्टॉप, सामना (नक्की नाव विसरलो ... वृद्धाश्रमात राहणारे दोन वृद्ध स्टेडियमवर सामना पाहत आहेत अशी काहीशी गोष्ट आहे.) ह्या एकांकिका वाचलेल्या आहेत. ( ... शिवाय दूरदर्शनवर देखो मगर प्यारसे अशी काहीतरी मालिका होती तीही थोडीशी पाहिलेली आहे. )
ह्या सर्वात मला 'बेगम बर्वे' हाच त्यांच्या लेखनाचा सर्वोच्च बिंदू वाटतो. ह्या सर्व लेखनामध्ये (देखो मगर ... सोडून) एकाने दुसऱ्या व्यक्तीच्या मनोविश्वात शिरणे हा समान धागा आहे. बेगम बर्वे मध्ये त्यांना त्या प्रकाराची नस नेमकी सापडल्यासारखी वाटते.
हे नाटक आले तेव्हा दूरदर्शनवर विजय तेंडुलकरांनी आळेकरांची मुलाखत घेतली होती. त्यात (गंधर्व की कोठल्यातरी) नाटककंपनीत दुय्यम स्त्रीभूमिका करणारा एक कलाकार आणि (अंगावरून वारे गेल्याने बेकार झालेला ?) खलनायकाची भूमिका करणारा एक नट (कंपनी बंद झाल्यावर - बुडल्यावर? ) एका जिन्याखालच्या खोलीत राहत असत. त्यात तो स्त्रीकलाकार त्या खलनायकाच्या काहीसा कह्यात असे, हे त्यांनी पाहिलेले होते असे त्यांनी सांगितले होते. त्यात तुम्ही ही बालगंधर्वांची नाटके कधी पाहिली होती का असा प्रश्न तेंडुलकरांनी त्यांना विचारला असता, शिलेदार मंडळींनी सादर केलेली नाटके त्यांच्या पाहण्यात आली असे त्यांनी सांगितले होते. (हे केवळ स्मरणातून लिहीत आहे. तपशीलाच्या चुका झाल्या असल्यास क्षमस्व.)
हे नाटक मी त्याच्या सुरवातीच्या काही प्रयोगांमध्ये भरत नाट्य मंदिरात पाहिले होते. ह्या नाटकात चंद्रकांत काळ्यांनी वठवलेली काहीशी स्त्रैण भूमिका आणि मोहन आगाश्यांनी वठवलेली खलनायकसदृश्य भूमिका विसरणे शक्य नाही.