माझ्या आवडत्या नाटकावरचं लिखाण वाचून आनंद झाला. नाटकाविषयी माझी काही मतं...

नाटकात काही प्रश्न विषय म्हणून घेण्याऐवजी आणि त्याचं निराकरण करण्याऐवजी अतिसामान्य म्हणता येईल अशा माणसांच्या आयुष्यातले काही विलक्षण कंगोरे दाखवले, हे महत्त्वाचं वाटलं. असे कंगोरे अस्तित्वात असतातच, पण क्वचितच त्यांचा नाट्यविषय बनतो.

नाटकातली प्रत्येक व्यक्ती वास्तवापासून तुटलेली आहे. स्वतःच्या आयुष्यातला केविलवाणेपणा भीतिदायक आहे. त्यापासून दूर पळण्यासाठी स्वप्नरंजनाचा आधार आहे. मध्यमवयीन, लग्नाचं वय उलटून गेलेला कारकून ऑफिसातल्या बाईविषयी स्वप्नरंजन करतो, तर दुय्यम दर्जाचा स्त्री-पार्टी नट स्वतःला स्त्री समजून संसाराची स्वप्नं रंगवतो. ही दोन स्वप्नं एकमेकांना भिडतात, तेव्हा या माणसांचा वास्तवावरचा ताबाच सुटू लागतो. पण वास्तवात ती माणसं आपापल्या कुटुंबांतच राहताहेत - दोन कारकून एकमेकांशी जे व्यवहार करतात, ते पाहता तो एक प्रकारचा  संसारच आहे. तसंच शामराव आणि बेगम यांचं आहे. या दोन संसारांत प्रत्येक व्यक्तीला दुसरीची गरज आहे. शामरावाचा मुर्दाड पुरुषीपणा बायकी बेगमला पूरक आहे, तर जावडेकर-बावडेकरांचं शनिवार-पेठी निम्न-मध्यमवर्गीयपण एकमेकांशीच गुंतलेलं आहे. कारकुनाशी संसार बेगमला निभणार नाही, तर कारकुनाला बेगम पेलणार नाही. त्यामुळे स्वप्न खरं होणं कोणालाच परवडणार नाही, कारण ते आपापल्या मूळ स्वभावालाच भेदणारं आहे. पण स्वप्न तसंच असतं (नाहीतर ते स्वप्नच राहणार नाही). असं स्वप्न म्हणूनच कधीतरी संपणारच आहे, आणि पुन्हा एकदा प्रत्येकाला आपापल्या अप्रिय, केविलवाण्या पण आपल्या वकुबानुसार व स्वभावानुसार अपरिहार्य अशा वास्तवात परत जाणं भाग पडणार आहे. हीच कुणाही सामान्य माणसाची परिस्थिती असते. ती सर्वसामान्य असल्याने तिला शोकांतिकाही म्हणता येत नाही; ते असंच असतं, इतकंच फारतर म्हणता येतं. त्यामुळे इथे आळेकर वैश्विक काहीतरी म्हणू पाहताहेत, असं वाटतं.