यात करता येण्यासारखे म्हणजे आधी मुलींनी स्वतःला "प्रदर्शित" करणे थांबवले पाहिजे. फॅशनच्या नावाखाली आपण काय करतो याचे त्यांनी भान ठेवले पाहिजे. आशुतोषजी म्हणतात त्याप्रमाणे तिजोरी उघडी टाकली तर चोरी झाली म्हणून ओरडायचा अधिकार राहत नाही. दुसरे म्हणजे सिनेमा नट्यांचे आदर्श ठेवणे बंद केले पाहिजे. आजकाल आदर्श ठेवावा अशी एक तरी नटी आहे का? पण आपल्याला राखी सावंतच्या स्वयंवरात इतका इंटरेस्ट असतो की आपण त्या बातम्या अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न असल्यासारख्या वाचतो. ( मुळात राखी सावंत सारख्या वादग्रस्त मुलीला आपली सून म्हणून स्वीकारायला लोकं तयार कसे होतात हाच मला पडलेला गहन प्रश्न आहे. असो! ) आणखी मुद्दा असा की आई-वडिलांनी आपल्या मुलींना लहानपणापासून नीट बसण्या उठण्याच्या सवई लावल्या पाहिजेत. शिवाय जर कोणी अंगावर आलाच तर प्रतिकार कसा करायचा हे आधी शिकवले पाहिजे. ज्यांना मुलगे आहेत त्यांनी पण त्या मुलांना मुलींचा आदर करायला शिकवले पाहिजे. मुलगी म्हणजे खेळातली वस्तू नाही हे त्यांच्या मनावर बिंबवले पाहिजे.  मैत्री करताना एक मर्यादा ठेवण्याची शिकवण दिली पाहिजे. आजकाल एक किंवा दोन मुले असतात. त्यात एक भाऊ आणि एक बहिण असेल तर जास्त प्रश्न येत नाहीत. पण एक मुलगाच आहे तर त्याला बहिण म्हणजे काय ते समजवावे लागते. सख्खी बहिण नसली तरी कोणतीतरी बहिण असतेच. मला एक मुलगा आहे. आता तो मोठा आहे. पण शाळेत असताना एकदा त्याने मला विचारले की मुलींशी मैत्री करणे वाईट असते का? त्यावर मी त्याला सांगितले की त्यात वाईट काही नाही. पण  प्रत्येक नात्याला एक मर्यादा असते. ती पाळली की कोणतेही नाते वाईट नसते. मात्र मुला-मुलींनी एकत्र कुठेतरी फिरायला जायचे नाही. शिवाय एकमेकांना होणारे स्पर्श आवर्जून टाळले पाहिजेत. कारण तिथूनच घसरण सुरू होते. आज त्याच्या कॉलेजच्या काही मैत्रिणी आहेत. पण मर्यादेत आहेत. माझा असा दावा नाही की मी फार आदर्श आई आहे. पण आपल्या मुलाचा पाय घसरू नये या साठी मला जे पटले ते मी केले. लहानपणी त्याला आणखी एक प्रश्न पडायचा की सिनेमातली हिरो हिरॉईन झाडामागे लपत , लोळत गाणी कसे म्हणतात. त्यावर मी त्याला सांगितले की मी आणि बाबा तुला घेऊन इतक्या वेळा बागेत गेलो. तिथे तुला असे काही दिसले का? हे सर्व खोटे असते. त्याला २/३ वेळा शुटिंगही दाखवले. त्यामुळे त्याच्या डोक्यात सिनेमाचे खूळ कधीही शिरले नाही. शिवाय मी त्याला आणखी एक सांगितले की बहिण ही कोणत्याही परिस्थितीत बहिणच असते. हे नाते कधीही बदलत नाही. मग ती मानलेली असली तरीही. अशा काही काळज्या घेतल्या तर मला वाटते निकोप पिढी जन्माला यायला काही हरकत नसावी.