ह्या नाटकाविषयी पूर्वी वाचले होते, मात्र ते पाहण्याचा योग काही कधी आला नाही. त्याचे इतके सुंदर रसग्रहण केल्याबद्दल विसुनानांचे अभिनंदन. समीक्षा, परीक्षण हे काहीसे रुक्ष शब्द मुद्दाम वापरत नाही. विसुनानांचे हे लेखन इतके सुंदर आहे की त्यांनी अशा आस्वादात्मक लेखांची मालिका लिहावी असे सुचवावेसे वाटते. वर्तमानपत्रात व्यावसायिक समीक्षकांनी टाकलेल्या परीक्षणांच्या पाट्यांहून हा लेख खूपच उजवा आहे.
अशा प्रकारच्या, टाळीची वाक्ये नसलेल्या, संयत, व स्पष्ट, ठोस उत्तरे न देणाऱ्या, चाकोरीबाहेरील नाटकांना फारसा लोकाश्रय लाभत नाही. (हल्ली तर प्रायोगिक म्हणवणाऱ्या नाटकांचाही एक साचा, एक विशिष्ट चौकट बनून गेल्यासारखी झाली आहे. त्यांतील संवादही, बाळ कोल्हटकरी नसले तरी, वेगळ्या दृष्टीने टाळीबाज वाटतात.) संगीत नाटकांनी ज्यांना वेड लावले अशांची शेवटची पिढीही आता जवळ जवळ अस्तंगत झाली आहे; व समलिंगी संबंध ह्या विषयावर चर्चेच्या फेऱ्या झोडणारी आताची पिढी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये आपल्या महाविद्यालयाच्या नाटकास टाळ्या वाजवण्यापलीकडे फारशी मराठी नाटकाकडे फिरकत नाही. अशा वातावरणात हे नाटक ३० वर्षे अधून मधून होत राहिले आहे हेच विशेष. त्याकरता आळेकरांचे व कलाकारांचे आभार नाट्यवेड्या रसिकांनी मानले पाहिजेत.
"प्रकाशाची झुळूक (तिरीप हा शब्द थोडा कर्कश वाटतो)"
प्रकाशाची झुळूक ह्या शब्दप्रयोगावर अडखळलो. कंसातील वाक्य वाचून वाटले की झुळूक ऐवजी कवडसा हा शब्द वापरता आला असता. पण क्षणभर विचार केल्यावर ह्या शब्दप्रयोगाचे कौतुक करावेसे वाटले. झुळूक ह्या शब्दाभोवती आल्हाददायक, शीतल, आनंददायक असे शब्द अदृश्यपणे वावरत असतात, त्या छटा झुळूक ह्या शब्दास असतात. हे लक्षात आल्यावर विसुनानांची शब्दयोजना किती अर्थपूर्ण व चपखल आहे हे जाणवले, व दाद द्यावीशी वाटली.