लैंगिक शोषण हा समाजासाठी नवीन विषय नाही पण आजकाल हा जास्तच तीव्र होत आहे. याला कारण सिनेमे, डांस बार, पार्ट्या, पब, नाइट क्लब,  आणि त्यात काही अंशी भर म्हणजे कोर्टाने दिलेले काही अजब निर्णय (लिव्ह इन रिलेशनशिप, दांपत्यांना चुंबनाची मुभा, समलिंगी लग्न कायदा). बदलत्या पिढीनुसार दांपत्यांनी विशेषतः ज्यांना मुली आहेत त्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. पालक म्हणून जागरूक राहणे गरजेचे आहे. खूप वेळा असे होते की मुली मैत्रिणीकडे म्हणून जातात. पण तेथे त्या एकट्या आहेत का? काय करत आहेत? हे कळत नाही. आज घरा घरात इंटरनेट आहेत. मुलं घरात इंटरनेट समोर बसून काय करता आहेत हे कदाचित कळण्या इतके काही पालक सुज्ञ नसतील. पण त्यांनी जागरूक राहायला हवे. काही वेळा जवळचेच लोक, उदा. नात्यातलीच लोकं, शेजारी, मैत्रिणीचा जवळचा नातेवाईक, पेइंग गेस्ट या पैकी कुणीही गैर फायदा घेणारा असतो. माहितीतला माणूस असल्याने मुली असल्या गोष्टी घरी सांगायला घाबरतात. कदाचित सांगावं की नाही हेच कळत नसावे. म्हणूनच मुलींना याबाबतीत सूचीत करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्तेक मुलीची आकलनशक्ती याबाबतीत कमी जास्त असते. आपल्या शरीराला कुणी त्या अर्थाने स्पर्श करते आहे हे कळण्या इतपत ज्ञान आईने आपल्या मुलीला द्यावे (देत असतीलच). घरातील वडिलांनी मात्र असल्यांना जाब विचारायला अजिबात कचरू नये. मुलीचे भविष्य पाहता इतर काही उपकाराचे ओझे असले तरी याबाबतीत अजिबात तडजोड करू नये.