योगेशच्या मताशी शंभर टक्के सहमत! स्त्री बलात्काराविरुद्ध तक्रार करण्याचे धारिष्ट्य दाखवते आहे म्हणून बलात्कारांचं प्रमाण वाढत आहे, असं वाटत आहे. स्त्री-पुरुष संबंधातील मोकळेपणा हे बलात्काराचं कारण असावं हे पटत नाही कारण ज्या स्त्रीचे कुणाशी मोकळे संबंध नसतात, तिलाही ह्या अत्याचाराला सामोरं जावं लागतं. आईने किंवा घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींनी केवळ मुलीलाच नाही तर मुलालाही स्त्रीशी वागण्याबोलण्याची रीत शिकवली पाहिजे.

मुळात बलात्काराचा अर्थ म्हणजे स्त्रीच्या इच्छेविरूद्ध तिच्यावर केलेली शारिरीक बळजोरी असा आहे. केवळ विवाहबाह्यच नाही तर विवाहांतर्गत संबंधातही बलात्कार होतात, किंबहुना तेच प्रमाण जास्त आहे. मात्र "नवरा बायको" असल्यामुळे स्त्रीच्या  विरोधाला  व तक्रारीला फारसं महत्त्व उरत नाही. उद्या जर एखाद्या विवाहित स्त्रीने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली की, "माझ्या पतिने माझ्यावर  बलात्कार केला, " तर पोलिस आधी हसतील, मग तिला समजावून घरी पाठवून देतील पण तक्रार लिहून घेणार नाहीत.

स्पर्श, सहवास या शारिरिक जवळीक वाढवणाऱ्या गोष्टी टाळल्या तरी बलात्कार होतातच. रस्त्यातून चालता चालता एखाद्या स्त्रीला मुद्दाम स्पर्श करणं हा लैंगिक शोषणाचा चटकन उरकता येणारा प्रकार झाला. स्त्री फार फार तर लोक जमा करून त्या माणसाला मारेल, तक्रार करेल. पण त्यापलिकडे कोर्टात जाण्यास ती तयार नसते म्हणून अशा लोकांचा आत्मविश्वास वाढत जातो.

भारतीय दंड संहितेच्या कलम नंबर १०० नुसार कोणतीही स्त्री, तिच्यावर बलात्कार करू पाहणाऱ्या व करणाऱ्या व्यक्तीस ठार मारू शकते. दुवा क्र. १ मात्र असं धाडसी पाऊल उचलण्यास स्त्री तयार नसते. आपल्याकडच्या जीवनपद्धती आणि संस्कारांमुळे बलात्कार म्हणजे आयुष्याची वाट लागली असंच स्त्रीच्या मनावर बिंबवलं जातं, परिणामी ती स्त्री अशा दु:खद घडनेनंतर कोलमडून पडते आणि कोलमडली नसेल, तर त्यासाठी तिला तिच्याच जवळची लोक मदत करतात.

मुलीच्या व मुलाच्याही पालकांनी जागरुक रहायला हवंच. ते खूप गरजेचं आहे. मात्र, कधी कधी आपल्या पाल्याच्या आयुष्यात काही दखल घेण्यासारखं घडलंय हे पाल्याच्या वागणुकीतून दिसत नाही. यासाठी मला असं वाटतं की मुळात स्त्रीची आणि पुरूषाची मानसिक जडणघडण ज्या वातावरणात होते, ते वातावरण देखील बदलायला हवं.

बलात्काऱ्याच्या शिक्षेचं प्रमाण हे साक्षीपुराव्यांवर अवलंबून असतं. बलात्कार करण्याची वृत्ती हा एक पसरत चाललेला रोग आहे हे लक्षात घेऊन कायदे कडक व्हायला हवेत. बलात्कारी व्यक्तीला शिक्षा होते परंतु ज्या स्त्रीवर बलात्कार होतो तिचं काय? बलात्काऱ्याला शिक्षा मिळाल्यामुळे तिला मानसिक समाधान मिळतं का, याचाही विचार करायला हवा. कारण, न्यायदानाच्या दृष्टीने बलात्कारी हा कायद्याचा गुन्हेगार असला तरी सर्व प्रथम तो त्या स्त्रीचा गुन्हेगार आहे. तिच्या मनाविरूद्ध तिचा मर्यादाभंग करून तो केवळ तिच्या शरिरावर नाही तर मनावरही कायमचा ओरखडा ठेवून जातो. तिच्या अपमानाची भरपाई जास्त महत्त्वाची आहे, असं मला वाटतं. नाहीतर उद्या ५०, ००० रुपये दंड आणि सहा महीने सक्तमजूरी ही शिक्षा बलात्काऱ्याला खूप कमी वाटायला लागेल आणि शिक्षा भोगून घरी आल्यावर तो पुन्हा नवीन अत्याचार करायला धजावेल.

मध्यंतरी एका विदेशी तरूणीवर झालेल्या बलात्काराची बातमी छापताना ’मुंबई मिरर' या वर्तमानपत्राने तिचा जबाब छापला होता, ज्यात वर्तमानपत्रात छापू नयेत, असे आक्षेपार्ह शब्द होते. सदर जबाब त्या तरूणीने पोलिसांसाठी दिला होता. कारण ’अमूक एक झालं म्हणजे बलात्कार झाला, ’ हे पोलिसांना ठरवताना मदत व्हावी म्हणून. हा तांत्रिक मुद्दा आहे. याची गरज न्यायालयात असतेच. मात्र मुंबई मिररने हा जबाब छापून काय साधलं? केवळ वर्तमानपत्राआ खप वाढवला. प्रसारमाध्यमांनी  नितिमत्ता, सर्वसाधारण विचारशक्ती जागेवर ठेऊन आपण जनतेपुढे काय सादर करतोय, याचा विचार करावा.

’बागबान’ या चित्रपटात हेमामालिनी यांच्या तोंडी एक विचार करण्यासारखं वाक्य आहे, "औरत के लिये जमाना कभी नही बदलता।" हे प्रत्येक स्त्रीने लक्षात ठेवलं पाहिजे आणि इतर स्त्रीयांनाही शिकवलं पाहिजे. स्त्री स्वत: विचारी, खंबीर आणि सावध असेल, तर अशा प्रकारांना आळा बसू शकतो.