मौन म्हणजे न बोलणे असा अर्थ नाही. मौन म्हणजे अंतर्बाह्य शांतता. संवाद रहितता! 'आपलाच वाद आपणाशी' ही तर सर्वांची सदैव चालू असलेली अवस्था आहे आणि तोच तर खरा त्रास आहे. तुम्ही कुठेही गेलात आणि कितीही न बोलता बसलात तरी आतली बडबड अनिर्बंध चालूच राहते आणि त्यापासून सुटका म्हणून तर आपल्याला सारखे कश्यात तरी गुंतून राहावे लागते. सदैव कार्यरत राहणे, पर्यटन, क्रिकेट, बातम्या, टिव्ही सिरियल्स, काहीच नाही तर पुढचे नियोजन, त्याहून मोठा गोंधळ म्हणजे नामःस्मरण हे सगळे जिव्हाळ्याचे विषय म्हणून तर इतके जोमानी चालू असतात.
अस्तित्वाला भाषा नाही किंवा मौन ही अस्तित्वाची भाषा आहे त्यामुळे तुम्ही जेंव्हा मौन म्हणजे अंतर्बाह्य शांत होता तेंव्हा पहिल्यांदा तुम्हाला कळतं की अस्तित्व एक आहे किंवा आपण नाही आहोत केवळ अस्तित्वच आहे किंवा अस्तित्व आणि आपण एकच आहोत.
कोणतेही अध्यात्मिक लेखन हे अनुभवातून आले नसले तर ते अंतर्विरोधी होते.
कोणता संत काय करत होता या पेक्षा आपण सर्वस्वी शांत कसे होऊ शकू किंवा आपल्या मनात चाललेली ही अखंड बडबड कश्यामुळे आहे आणि आपण तिच्याकडे दुर्लक्ष्य का करू शकत नाही हा खरा प्रश्न आहे. आपण कधीही काहीही बोलत नाही हा जेंव्हा तुमचा वैयक्तिक अनुभव होईल तेंव्हा मौन धारण करावे लागत नाही तर मौन हे आपले स्वरूप आहे, आपण स्वतःच 'मौन' आहोत हे तुमच्या लक्ष्यात येईल.
संजय