मराठी शब्दाचा अर्थ मराठीतच स्पष्ट करणारे शब्दकोश अस्तित्वात नाहीत. जे कोश आहेत ते फक्त शब्दाचा त्यातल्या त्यात जवळचा अर्थ असलेले प्रतिशब्द देतात. ज्या अर्थी तंतोतंत सारख्या अर्थाचे दोन शब्द एका भाषेत क्वचितच आढळतात, त्या अर्थी अशा कोशांचा वापर करून अर्थच्छटा समजणार नाहीत हे उघड आहे. यावर उपाय म्हणजे अनेक कोश संग्रही ठेवणे आणि वाचन करत असताना किंवा बहुश्रुत मराठी भाषकांचे बोलणे ऐकत असताना वेगवेगळे शब्द कुठेकुठे, कसे व कोणत्या अर्थाने वापरले आहेत ते निरीक्षण करून नंतर कोशावरून समजावून घेणे.
माझ्या माहितीप्रमाणे, मोल्सवर्थ आणि वझे हे दोनच कोश आंतरजालावर आहेत. मोल्सवर्थ हा मराठी-इंग्रजी कोश व कॅन्डीचा तसेच नी.बा.रानडे यांचे इंग्रजी- मराठी कोश उत्कृष्ट आहेत. याहून चांगले द्विभाषिक कोश अजून झालेले नाहीत.
विकतच घ्यायचेच असतील तर खालील मराठी कोश घ्यावेत.
अग्निहोत्री(पाच खंड), वा.गो.आपटेऱ्ह.अ.भावे, भिडे-वाळिंबे, दाते-कर्वे(सात खंड व पुरवणी खंड), प्र. न. जोशी, य. ना. वालावलकर, मो. वि. भाटवडेकर, सत्त्वशीला सामंत वगैरे वगैरे. यांचे वेगळ्यावेगळ्या उद्देशांनी लिहिलेले कोश आहेत. एकासारखा दुसरा नाही. शिवाय व्युत्पत्ती कोश तसेच म्हणी आणि वाक्प्रचार यांचा संग्रह असलेले कोशही जवळ असावेत.
इतके कोश वापरूनही मराठी शब्दांतले तरलतम अर्थभेद समजतीलच असे नाही. फक्त इच्छा धरणे आणि प्रयत्न करणे आपल्या हाती.