मराठी माणसाचे "मराठी"पण आहे का? आधी मराठीचा मुद्दा घेऊन भांडण करत मराठी माणसाला मुंबईत स्थिर करण्याचे काम शिवसेनेने केले, हे १००% मान्य. पण मला एक कळते की एकदा साफसफाई झाली की नवीन जागी काहीतरी रंगरंगोटी करायला नको? रिकाम्या जागांवर मराठी तरुणांना काम द्यायला मदत करायला नको? फक्त "लुंगी हटाव" म्हणून कसं चालेल, तिथे आपले पागोटे स्थिर करायला नको?
पैसे खाणे हा राजकारणाचा एक भाग आहे, हे सगळेच मान्य करतात पण म्हणून कामच करू नये? युतीला सत्ता मिळाली ती काँग्रेसच्या नाकर्त्यांमुळे, सेनेचे कामांमुळे नाही, हे जर त्यावेळी समजून घेतलं असतं आणि ती ५ वर्ष "प्रामाणिक"पणे जनसेवा केली असती, कायद्याची अंमलबजावणी करत स्थानिकांना सामावून घेतलं असतं, लघु-उद्योगांना अधिक बळ दिलं असतं तर पुन्हा काँग्रेसची महाराष्ट्रात कधीच सत्ता आली नसती.
पण.... सत्ता मिळाली अन डोक्यात वारं घुसल्यासारखे युतीवाले करायला लागले. "मराठीकडून हिंदुत्व.... " "मी मुंबईकर" आणि काय नाही. जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या पक्षाकडून नेहमीच अधिक अपेक्षा असतात, म्हणूनच राज्यात काय आणि केंद्रात काय, सत्ता गेली ती गेलीच.
आता, शिवसेनेला (किंवा इतर कोणालाही) उभं राहायचं असेल तर पुन्हा एकदा सुरुवात करावी लागेल. "ग्रास रुट" (प्रतिशब्द? ) वर काम करावं लागेल. केवळ शिवाजी महाराजांचा पुतळा आणि जयंतीपुरतं काम करून चालणार नाही तर स्वयंरोजगाराच्या माध्यमातून तरुणांना काम मिळवून द्यावं लागेल..... आणि मराठी माणसाने खंजीर खुपसला म्हणण्यापेक्षा आपणच मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला होता आता त्याची दुरुस्ती करायची आहे म्हणून कामाला लागावं लागेल...... अन्यथा शिवसेनेचे विसर्जन काही वर्षात करावे लागेल ज्याचं त्यावेळी दुर्दैवाने कोणालाही दु:ख होणार नाही.