फार विस्तृत आहे. दर पांच मैलावर भाषा बदलते, असे म्हणतात. नागरी मराठी ही संस्कृत भाषेची अंगवस्त्रे लेवून नटते. प्राकृत मराठी ही भावनांना व्यक्त करताना स्वाभाविक सौंदर्य दाखविते. तेथील शब्दधन अमर्याद आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शतकानुशतके पर-अंमलाखाली राहिल्याने त्या त्या भाषेतील शब्दांनी वेगळे रूप घेऊन मराठीत स्थान मिळविले आहे. त्यामुळे मराठी शब्दांच्या वापरातील सूक्ष्मतरल फरक  दाखविणारा शब्दकोश अजून तरी ऐकिवात नाही. त्यासाठी बहुश्रृतताच हवी. महाराष्ट्र सरकारने हाती घेतलेले मराठी शब्दकोशाचे काम अजून अर्धवट आहे. पहिला खंड प्रसिद्ध झाला आहे. त्यात 'अ'ते'औ' शब्द मिळतात. पुढील खंडांची प्रतीक्षा आहे. हा शब्दकोश इतर शब्दकोशांपेक्षा उजवा असेल. सध्या मी संस्कृत, (नालंदा) हिंदी आणि मराठी (वागोआपटे) शब्दकोशांची मदद घेत असतो.