दर पांच मैलावर भाषा बदलते.
असेलही, नक्की माहीत नाही. परंतु जुन्या समजुतीप्रमाणे दर १२ कोसांवर भाषा बदलत असे. आता वाचन-लेखन-श्रवण वाढले असल्याने इतक्या कमी अंतरावर बदलत नसावी.
बहुश्रृतता. हा शब्द बहुश्रुतता किंवा बहुश्रुतता असा लिहायला हवा. 'श'ला 'र' आणि 'ऋ' दोन्ही जोडायची गरज नाही. त्यामुळे शृंगार, चतःशृंगी हे योग्य लिखाण. श्रृंगार, चतःश्रृंगी लिहिणे योग्य नाही. या दोनही शब्दांत 'श्री'मधला, 'र' न जोडलेला श लिहून त्याला ऋकार जोडला तरी चालेल. पण कुठल्याही परिस्थिती 'र' आणि 'ऋ' दोन्ही जोडले जाऊ नयेत. हे शब्द इतक्या वेळी चुकीचेच लिहिलेले दिसतात की, बरोबर शब्द बघायलाच मिळत नाही.
महाराष्ट्र सरकारने हाती घेतलेले मराठी शब्दकोशाचे काम अजून अर्धवट आहे.
पहिला खंड प्रसिद्ध झाला आहे. त्यात 'अ'ते'औ' शब्द मिळतात. पुढील खंडांची
प्रतीक्षा आहे. हा शब्दकोश इतर शब्दकोशांपेक्षा उजवा असेल.
पहिल्या खंडावरून तरी तसे वाटत नाही. निष्कारण मोठा टंक वापरल्याने मजकूर कमी मावला आहे. शिवाय शब्दांना फक्त प्रतिशब्द दिले आहेत. शब्दांचे अर्थ, अर्थांच्या विविध छटा, तसेच शब्दांचे वाक्यात उपयोग दिले नसल्या कारणाने शब्दकोश फार चांगला होईल असे वाटत नाही.
संस्कृत-मराठी कोशांमध्ये स्वस्त आणि उत्तम ज. वि. ओकांचा गीर्वाणलघुकोश आहे. आणि मराठी-मराठी कोशांत चांगला कोश दाते-कर्व्यांचा, आणि त्यापाठोपाठ द. ह. अग्निहोत्रींचा पाचखंडी कोश. अर्थात वा. गो. आपट्यांचा ह. अ. भाव्यांनी वाढवलेला कोशदेखील बरा आहे, पण फार छोटा आहे. त्यात म्हणी आणि वाक्प्रचार मिळत नसल्याने कोशाची उपयुक्तता कमी होते.