दिव्याचा कृत्रिम प्रकाश कितीही मोठा असला तरी तो सूर्यप्रकाशाइतका स्वच्छ नसतो. रात्री नखे काढू नयेत हे उत्तम आणि झाडून काढल्यास तो केर लगेच टाकून देऊ नये हेही योग्य. मोझाइक टाइल्सवरती पाणी पडलेले दिसत नाही तर बारीकसारीक केर कसा दिसेल?
रात्रभर आडव्या पडलेल्या केरसुणीखाली पावसाळ्याच्या सकाळी हमखास गोम, गोगलगाय किंवा गांडूळ सापडते. अधिक माहितीसाठी, जी माणसे भोवती बगिच्या असलेल्या बंगल्यात तळमजल्यावर राहतात, त्यांना विचारावे.
ज्यांच्याकडे गुळगुळीत स्वच्छतागृहे असतात आणि फ्लशसाठी जे दोनदोन बादल्या पाणी वापरतात, त्यांनी पाय धुण्याला तांब्याभर पाणी वापरू नये हे आश्चर्य! पाय न धुता एखादा माणूस स्व'̱गृहाबाहेर आला की त्याला कसे वाटते यापेक्षा बाहेरच्या लोकांना तो अपवित्र वाटतो का, हे महत्त्वाचे. अनेक गोष्टी आपण लोकांसाठी करत असतो, त्यांतली ही समजावी. पाणी हा एकच असा पदार्थ आहे की ज्याला धुवावे लागत नाही. पाय धुतल्याशिवाय राहणे हा गलिच्छपणाच.
तेल आणि मिठाचे नियम कुणी पाळत असतील असे मल वाटत नाही. पण माणसावर काही बंधने जरूर असावीत. एकादशी-संकष्टीला उपास करायला जे कारण आहे तेच, तेल-मीठ यांच्या खरेदीला आणि शनिवारच्या हरबऱ्याच्या डाळीच्या किंवा चातुर्मासातील कांदा-लसूण-वांग्याच्या सेवनाला आहे. संयम! संयम!! आणि संयम!!!