नरकासुरासाठी अनेकानेक पौराणिक संदर्भ आहेत. त्यातला एक, महाभारताच्या द्रोणपर्वातला श्लोक क्र. २८. दक्षाबद्दल महाभारतातील शांतिपर्व परिशिष्ट १.२८ पाहावे. हे दोघेही ईशान्य भारतातलेच.
मात्र भीष्मक ईशान्य भारताचा नसावा. भीष्मकाची कन्या रुक्मिणी ही विदर्भातली होती सर्वश्रुत आहे. भीष्मकाची राजधानी वऱ्हाडातल्या कुंडनपूर(कौंडिण्यपूर) येथे होती, असे वाचल्याचे आठवले. शोधल्यावर सापडले की कुंडिनपूर अयोध्येच्या नैऋत्येला ७००मैलावर, आणि अयोध्येपासून ४४० मैलावरील नागपूर आणि ५००मैलावरील चंद्रपूर यांच्या पश्चिमेला होते. म्हणजे ते ईशान्य भारतात असणे शक्य नाही. अजराजा अयोध्येहून कुंडिनपूरला स्वयंवरासाठी गेला तेव्हा त्याला वाटेत नर्मदा ओलांडावी लागली होती असे कालिदासाने रघुवंशात लिहिले आहे. रुक्मिणीचे ज्या शिशुपालाशी लग्न ठरवले होते, तो चेदि(बुंदेलखंड?) देशाचा राजा होता. त्याची राजधानी शुक्तिमती नावाचे गाव होते. हे गांव विदर्भाच्या ईशान्येला अतिदूर होते. ज्याने रुक्मिणीला पळवून नेऊन तिच्याशी लग्न केले तो श्रीकृष्ण तेव्हा विदर्भाच्या पश्चिमेला म्हणजे द्वारका बेटावर होता. यावरून भीष्मक राजाचे राज्य ईशान्य भारतात असणे शक्य नाही हे स्पष्ट आहे.