प्रवासी,
आज रिकामा वेळ जरा जास्त मिळाला म्हणून मनोगतावरील तंत्र सदरातील जुनी पाने चाळायला घेतली. तेव्हा आपले हे निद्रासंगीत सापडले. त्यात 'दुपारच्या रागांची' भर घालावी असे वाटले म्हणून हा प्रपंच.
सुट्टीचा दिवस असावा आणि जास्तीचे काही कामही घेतलेले नसावे. सुट्टी म्हणून जेवण जरा उशीराच होते. ते संपतासंपताच सुस्ती यायला लागते. मग चटई जमिनीवर टाकून, एखादे पुस्तक हातात धरून पडावे. अर्धे पान वाचून व्हायच्या आतच पुस्तक हातातून गळून पडते आणि आपण निद्रादेवीच्या साम्राज्यात जातो. ("पूर्वी निद्रादेवी वगैरेंची साम्राज्ये होती, आता ती खालसा झाली" - इति पुल; बटाट्याची चाळ. पण माझ्यावर निद्रादेवी प्रसन्न आहे.) मग दीडेक तासाने जाग यावी ती कुणाच्या तरी "चहा झालाय" ह्या वाक्याने. अहाहा! लिहिताना सुद्धा किती छान वाटतंय!
पूर्वी ही जाग यायची स्पिरिटच्या वासाने. म्हणजे ष्टो ("इंग्रजी स्टोव्ह् चे मराठी भाषांतर ष्टो आहे!" हेही पुलंच्याच कुठल्यातरी पुस्तकात) पेटवताना काकडा स्पिरिटमध्ये बुडवावा लागायचा, त्याचा वास यायचा. मग काही मिनिटात ष्टोची घरघर. मग वेळेचा अंदाज घेऊन आपण उठायचं. हे जास्त चांगलं कारण जागृतावस्थेत येण्याची प्रक्रिया हळूहळू होते.
असो. सप्ताहान्तात हे स्वप्न पुरे करण्याचा संकल्प सोडला आहे!
मीरा