दैनिक सकाळ च्या ई-आवृत्तीत मला हा लेख गवसला. अवश्य वाचा! धन्यवाद!!



पारंपरिक पत्रावळ्यांनाही प्लास्टिकचा साज
सकाळ वृत्तसेवा

दिखाऊपणा आल्याने झाडांच्या पानांपासून टाचलेल्या, शिवलेल्या पत्रावळ्या अनेकांना गैरसोयीच्या वाटू लागल्या आहेत.

नाशिक, ता. ५ -  समारंभ असो वा घरगुती कार्यक्रम, पत्रावळ्यांना मोठे महत्त्व असते. सध्या मात्र समारंभांतही प्रतिष्ठा व दिखाऊपणा आल्याने झाडांच्या पानांपासून टाचलेल्या, शिवलेल्या पत्रावळ्या अनेकांना गैरसोयीच्या वाटू लागल्या आहेत.
नेमक्‍या याच गरजेतून पत्रावळ्या बाजूला पडल्या आणि टेबल-खुर्चीवर ताट आले. सध्या या ताटांची जागाही प्लास्टिक, थर्माकोल व चंदेरी फॉइलच्या विविध आकर्षक बनावटीच्या, रंगांच्या पत्रावळ्यांनी घेतली असून, हा व्यवसायही सध्या तेजीत आहे.
पत्रावळीनेही आज आधुनिक रूप धारण केले आहे. पूर्वी केळीच्या पानावर वाढलेले जेवण उठून दिसत असे. केळीचे पान कमी झाल्यानंतर मोठमोठी पाने असलेल्या झाडाच्या पानांपासून पत्रावळी बनवली गेली. ती आजतागायत सर्रास वापरली जाते. खेड्यात अद्यापही चूलबंद आमंत्रण असेल तर सर्व मंडळी घरूनच ताट-वाटी घेऊन पंगतीत बसतात. पळस, मोह, साग, वड अशा झाडांची पाने एकत्र करून गोलाकार पत्रावळी बनविली जाते.
पाने वाळल्यानंतर कशीही वाकडी तिकडी होतात. म्हणून त्यावर दगड किंवा जात्याची गोलाकार पाळी वजन म्हणून ठेवली जाते. वाळल्यानंतर पत्रावळीस कापून गोलाकार आकार दिला जातो. या पत्रावळीनेही आज आधुनिक रूप धारण केले आहे. केळी किंवा इतर झाडांच्या पानांची जागा आता जाड खाकी कागद, प्लास्टिक, फॉइल, थर्माकोलच्या ताटांनी घेतली आहे.
 केळीच्या पानावरील जेवण आता फक्त धार्मिक विधीपुरतेच मर्यादित राहिले आहे. पत्रावळीतील कागद कुजतो परंतु प्लास्टिक, फॉइल, थर्माकोल कुजत नसल्याने लोकांची सोय झाली असली तरी पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिक, फॉइल, थर्माकोलची ताटे हानिकारक आहेत.
पत्रावळी व द्रोणात अलीकडे विविध प्रकार आले आहेत. साधी पत्रावळी, शिलाईची पत्रावळी, सिल्व्हर, गोल्डन, थर्माकोल असे विविध प्रकार आहेत. प्लास्टिकचे गोल, चौकोनी द्रोणही उपलब्ध आहेत. यंदा लग्नसराईमुळे मागणी तेजीत असली तरीही स्पर्धेमुळे भाव मात्र स्थिर आहेत.
यात साधी पत्रावळी (८० चा बंडल) तीस रुपये, शिलाई पत्रावळी (८० चा बंडल) चाळीस रुपये, सिल्व्हर (५० चा बंडल) ऐंशी रुपये, थर्माकोल (१०० चा बंडल) एकशे पन्नास रुपये, द्रोण साधा (१००) पंधरा रुपये, सिल्हर (१००) तीस रुपये, प्लास्टिक (१००) चाळीस रुपये. लॉन्समुळे पत्रावळींच्या विक्रीत दिवसेंदिवस घट होत आहे. तेथे केटररला ठरवून दिलेल्या ताट पद्धतीमुळे द्रोण व पत्रावळीची जागा ताटाने घेतली आहे. ग्रामीण भागातील ग्राहक मात्र अद्यापही टिकून आहेत.
पर्यावरणालाही तडाखा
पत्रावळ्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या झाडांची हिरवी पाने प्रामुख्याने जंगलातील तसेच मोठ्या वृक्षांची असतात. या झाडांची पाने खुरटल्यावर नवी पाने येण्यास दीर्घ कालावधी लागत नसे. विशेषतः पळस, साग या वृक्षांची पाने यासाठी वापरली जातात. पत्रावळ्या जमिनीत लवकर कुजून त्याचे खत होते. सध्या मात्र थर्माकोल व प्लास्टिकचा वापर असलेल्या द्रोण व पत्रावळ्यांमुळे परिसरात घाण तर होतेच, शिवाय ती नष्ट होण्यास कित्येक वर्षे लागतात. त्यामुळे पर्यावरणविषयक जागृती करणाऱ्या संस्थांनी याबाबत प्रबोधन सुरू केले आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रस्तुत लेखातील माहिती ह्या निमित्ताने सर्वांच्या निदर्शनास आणण्यासाठी हा खटाटोप!! धन्यवाद!

- अरुंधती
दुवा क्र. १