व्याकरणातील वर्गीकरणाप्रमाणे परभाषी शिकल्याचे आठवते. म्हणजे काय? समजले नाही. येथे व्याकरणाचा काय संबंध? खुलासा व्हावा.

भाषा हा शब्द संस्कृत भाष(१ आ. ) या धातूपासून बनला. भाष म्हणजे बोलणे. ज्या काळात लिहिणे नव्हते त्या काळात भाषा म्हणजे बोललेले अर्थपूर्ण शब्द हा अर्थ योग्य होता. आताच्या काळात भाषा म्हणजे बोलणे, म्हणणे, सांगणे, संवाद, निवेदन, व्याख्यान, कीर्तन, प्रवचन, काव्यवाचन, गीतगायन आणि लेखन इत्यादींसाठी वापरले जाणारे सार्थ शब्दबद्ध साधन आणि माध्यम. मी कसेही कपडे घालीन किंवा पानामध्ये अन्नपदार्थ कसेही वाढीन हे जसे सुसंस्कृत समजले जात नाही तसेच, मी कसेही बोलीन किंवा लिहीन, ते आपण गोड मानून घेतलेच पाहिजे असा उद्दामपणा समाजाला मान्य नसावा. असे कोणी करीत असेल तर त्याला आपण आपली नापसंती दर्शवली पाहिजे आणि शक्य तेथे विरोध केला पाहिजे. बोलताना बोलीभाषा आणि लिहिताना प्रमाणभाषा हे सूत्र जगातले बहुसंख्य भाषक पाळतात; मराठीभाषकांनी ते पाळायला हरकत नाही.   विनाकारण आणि जाणूनबुजून धेडगुजरी शब्दांचा लिखाणात वापर ही लेखनातील त्रुटीच आहे. बोलताना प्रत्यक्षात वापरली गेलेली भाषा लिखाणात जशीच्या तशी शब्दबद्ध करताना जेथे अपरिहार्यता जाणवेल, तेथे अपवाद करावा लागेल.   पण असे अपवाद अपवादानेच असावेत. नाही तर, आधीच भ्रष्ट झालेली मराठी अस्तंगताला लागेल.

काही भाषाविषयक शब्दः
भाषक : विशिष्ट मातृभाषा असणारा. उदाo मराठीभाषक.  
भाषी : भाषाज्ञानी; बोलणारा. उदाo दुभाषी,  बहुभाषी, विभाषी, परभाषी;   द्विभाषी, मितभाषी, आंग्लभाषी.
भाषिक : भाषेसंबंधी/भाषांविषयी. उदाo भाषिक विज्ञान(=भाषिकी=लिंग्विस्टिक्स), भाषिक(लिंग्विस्टिक)दुराग्रह/समंजसपणा.  
भाषीय : भाषेचा. उदाo परभाषीय शब्दांचा वापर.  
परभाषा : आपली मातृभाषा नसलेली भाषा.
विभाषा=परकीय भाषा : स्वकीय नसलेली भाषा.  
परकी भाषा : अपरिचित भाषा.
परिभाषा : विशिष्ट विषयासाठी बनवलेली खास तांत्रिक भाषा(टर्मिनॉलॉजी).
पारिभाषिक शब्द : टर्म.
याशिवाय मातृभाषा, पितृभाषा, प्रमाणभाषा, राज्यभाषा, राष्ट्रभाषा, देशभाषा, प्रादेशिक भाषा, कायद्याची भाषा, पोलिसी भाषा, कार्यालयीन भाषा, उपभाषा, बोलीभाषा, ग्रामीण भाषा, गांवढळ भाषा, शहरी भाषा, धेडगुजरी भाषा, पुणेरी सदाशिवपेठी भाषा, पुस्तकी(ग्रांथिक) भाषा, जडजंबाळ(विद्वत्ताप्रचुर) भाषा, सातारी भाषा, वऱ्हाडी भाषा, अश्लील(ग्राम्य)भाषा, अ-शिष्टसंमत भाषा(स्लँग), अ‍ौपचारिक/अनौपचारिक भाषा, टपोरी/चालू भाषा, 'च'ची भाषा, सांकेतिक भाषा, टिंबाटिंबांची भाषा, फुल्याफुल्यांची भाषा, गणिती भाषा, व्यवहाराची भाषा, व्यापारी भाषा वगैरे वगैरे.  

म्हणजे लेखाच्या मथळ्यामध्ये परभाषी किंवा परभाषिक यांतला एखादा शब्द वापरण्याऐवजी परभाषीय किंवा परभाषेतील शब्द असा प्रयोग केला गेला असता तर उचित झाले असते असे मला वाटते.