कुरसी(अरबी)वरून मराठीत खुर्ची  आला. अशा परकीय भाषांतून आलेल्या शब्दांना व्याकरणात 'परभाषी' अशी संज्ञा आहे हे मला खरोखरच माहीत नव्हते.  त्यांना अ-मराठी, गैर-मराठी, बिगर-मराठी, किंवा मी वर लिहिले आहे त्याप्रमाणे परभाषीय शब्द म्हणतात असेच मला वाटत होते. (भाषेचा उगम आणि तिच्यातील शब्दांची व्युत्पत्ती  हा स्वतंत्र विषय असून तो व्याकरणात येत नाही असे काही व्याकरणकारांचे मत आहे.)

शब्दांच्या वर्गीकरणात देशज शब्द हाही एक प्रकार आहे. देशज शब्द कुठल्याही दुसऱ्या भाषेतून आले असे सिद्ध करता येत नाही , ते बहुधा आपल्याच भाषेसाठी जन्मले असावेत, अशी कल्पना आहे.

भाषांचे विविध प्रकार सांगताना कृत्रिम भाषा हा प्रकार द्यायचा राहून गेला. या प्रकारची भाषा आपण जाहिरातींमध्ये रोज वाचतो, ऐकतो, सहन करतो आणि तसे करण्यास आपल्याला काहीही गैर वाटत नाही.  (आपल्यासारखे मुर्दाड आपणच!) असली भाषा व्याकरणभ्रष्ट तर असतेच, शिवाय कुठल्यातरी अ-मराठी भाषेतील वाक्यरचनेचे अनुकरण केल्यामुळे कृत्रिम वाटते.
मराठीत कर्ता, कर्म आणि क्रियापद ही वाक्यरचनेची सामान्य पद्धत. कर्त्याची विशेषणे कर्त्याच्या आधी, कर्माची त्याच्या आधी आणि क्रियाविशेषणे क्रियापदाच्या अगोदर. आणला आहे बाजारात सुखासाठी तुमच्या अमुकतमुक साबण, हे वाक्य मराठी नाही.  त्याचप्रमाणे संयुक्त वाक्यात दुय्यम वाक्यांश मुख्य वाक्यानंतर घेणे ही कृत्रिम वाक्यरचना मराठी नाही. उदाo करा खरदी आजच असा आमचा साबण, की जो करेल तुमच्या आरोग्यात कमालीचा बदल आणि ज्याच्यामुळे होईल बचत तुमच्या खर्चात .
याचे कारण, जाहिरात मूळ हिंदी किंवा इंग्रजीत असते आणि तिचे मराठीत भाषांतर करणारे जातिवंत अडाणी असतात. मूळ मराठीत तयार केलेली एकच जाहिरात मला माहीत आहे, आणि ती म्हणजे डी‌एस्‌केंची 'घराला घरपण देणारी माणसं' . (हिचे हिंदी-इंग्रजी भाषांतर कसे करावे?)अशी दुसरी मूळ मराठीत बनली आहे अशी जाहिरात सापडली जर मनोगतावर जरूर प्रसिद्ध करावी.