मूळ गाणे : "दिल तेरा दीवाना है सनम"
चित्रपट : दिल तेरा दीवाना
टवाळराव, हा स्वैर अनुवाद आहे की भाषांतर हे स्पष्ट नाही. स्वैर अनुवाद असल्यास माझे खाली नमूद केलेले आक्षेप गैरलागू आहेत व त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे. मात्र भाषांतर असल्यास त्यावर अधिक विचार करायला हवा होता असे वाटते
"प्यार के अलबेले यह हमसफर
चल देंगे ले जायेगा दिल जिधर
राहमें खो जाएंगे आज
मंजिल कहां हैं हमें क्या खबर"
ह्यात 'आम्ही प्रेमाच्या वाटेवरील मस्त प्रवासी आहोत, प्रेमाचा रस्ता जिथे नेईल तिथे आम्ही जाऊ, हरवून जाऊ, मंजिल/ध्येय कुठे आहे हे आम्हांस ठाऊकही नाही' असा अर्थ दिसतो, जो
चालताना जर का रस्ता चुके
पोहोचू कोठे ते ना माहिती
ह्या भाषांतरात नाही. मूळ कडव्यात प्रेमामुळे आलेली एक धुंदी, बेफिकिरी आहे, प्रेमपथावर हरवून जाण्याची सुप्त इच्छा आहे. अनुवादातील "जर" मुळे अर्थहानी होत आहे. तसेच मूळ गाण्यातील 'अलबेले' हाही शब्द ह्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
डोळ्यातुन तव संजीवन ओघळे
हे जे घडले ते सारे त्यामुळे
"तेरी आँखोंमें जो सरूर है" - सरूर म्हणजे उत्साह, चेव, हर्षोत्साह. संजीवन नाही.
"सैंया अंजानी नगरी प्यार की
नादां यह दिल मेरा मजबूर है"
ह्याचे
किमया ही प्रेमकटाक्षांची प्रिया,
भोळ्या हृदयाला माझ्या ना कळे
हे भाषांतर पटत नाही. एकूण ह्या मूळ कडव्याचा अर्थ काहीसा असा असावा : तो - 'हे जे काही घडते आहे, ही जी काही प्रेमाची चूक आपल्याकडून घडते आहे ती तुझ्या डोळ्यातील हर्षोत्साहामुळे.' ती : 'मी तरी काय करू? ही प्रेमाची नगरी माझ्यासाठीही अपरिचित आहे, नवी आहे. माझे अजाण हृदय प्रेमामुळे हतबल झाले आहे, माझा त्यावर ताबा राहिलेला नाही.'
काय करू मन ज्याच्यावर भाळले
माझ्या हृदयाला त्याने व्यापले
"क्या कीजे, कोई मन भा गया
दिलमें हमारे वह समा गया"
'कोई मन भा गया, दिलमें हमारे वह समा गया' म्हणजे 'माझ्या मनात कोणीतरी भरला, माझ्या हृदयात सामावला'. इथे 'तोच' माझ्या हृदयात सामावला, दुसरा कोणी नाही' असा भाव नाही. तेव्हा 'ज्याच्यावर' ऐवजी 'त्याच्यावर' वापरले तर अर्थछटेस न्याय मिळेल.
'हंसके किसीने देखा एक बार - म्हणजे तिने माझ्याकडे हसून पाहिले
दिल की मुरादें कोई पा गया' - माझ्या हृदयाची इच्छा पूर्ण झाली (तीही माझ्या प्रेमात पडली आहे हे तिच्या हास्याने सिद्ध झाले.) पाह्यले हासुन कोणी एकवार
हृदयाच्या आकांक्षांना जिंकले
ह्यातून मात्र तिने एकवार हासून माझ्याकडे पाहिले व (तिने) हृदयाच्या आकांक्षांना जिंकले असा अर्थ निघतो जो कवीस अभिप्रेत नाही.