पुण्याच्या वाहतूक समस्येवर उपाय आहे, पण त्याकडे कुणालाही लक्ष द्यायचे नाही. अर्थात हा उपाय सर्वंकष किंवा एकमेव नाही, परंतु त्यामुळे सध्याच्या जीवघेण्या स्थितीत दिलासा मिळू शकतो. हा उपाय आहे मोनोरेल. यासाठी शहरातील जागा संपादन करायचीही गरज नाही. जागा अगदी कमी लागणार आहे आणि ती आयती उपलब्ध आहे. पुण्यातील नदीचे पात्र पावसाळा वगळता एरवी कोरडेच असते. या पात्राच्या कडेला पूरपातळीच्या खूप उंच म्हणजे सध्याच्या पुलांच्या समपातळीत मोनोरेल चालवल्यास शहरातील महत्त्वाचे भाग जोडले जातील. मोनोरेलचे खूपच फायदे आहेत. एक तर तिच्या मार्गात वाहनांचा अडथळा नसल्याने एक वेगवान सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुणेकरांना उपलब्ध होईल. बांधकामाचा आणि देखभालीचा खर्च खूपच कमी येईल. बीआरटी अथवा मेट्रो (भुयारी) यापेक्षा मोनोरेल लवकर उभारून होइल.