मराठी अभ्यास केंद्राने आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी खालील कृतिगट स्थापन केले आहेत. त्यापैकी कुठल्याही कृतीगटाशी आपण जोडून घेऊ शकता.
१. मराठी माहिती कोष
मराठी भाषा व संस्कृती यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या व कार्य करू इच्छिणाऱ्या व्यक्ती, संस्था तसेच उपलब्ध साधनसामग्री यांची माहिती, आकडेवारी यांचे एकत्रीकरण करणे.
२. मराठी संशोधन प्रकल्प
मराठी भाषा विषयक प्रश्नांसंबधी संशोधन, सर्वेक्षण प्रकल्प स्वतंत्रपणे व सहकार्याने राबविणे. ह्या संशोधनाचा मराठीच्या विकासासाठी उपयोग करून घेणे.
३. मराठी विद्याजगत
शालेय व उच्च शिक्षणातील मराठी भाषेचे प्रश्न समजून घेऊन मराठीचा शिक्षणाचे माध्यम म्हणून वापर वाढवण्यासाठी प्रयत्न करणे.
४. मराठी रोजगार
रोजगार, व्यवसाय, उद्योगक्षेत्रातील मराठीच्या वापराला चालना देणे. त्यासाठी शिक्षण, कला, व्यवहार, उद्योग, प्रसारमाध्यमे इत्यादी क्षेत्रांतील व्यक्तींचे, संस्थांचे प्रश्न समजून घेणे, त्यांना एकत्र आणणे उद्योग क्षेत्रातील व्यवसायांचे, व्यवहारातील अनेक क्षेत्रांचे अभ्यासक्रम/प्रशिक्षण मराठीत आणणे.
५. मराठी संस्था
महाविद्यालयांची-विद्यापीठांमधील मराठी विभाग/वाङमय मंडळे व इतर भाषा-साहित्य संस्था यांच्यात समन्वय साधून मराठीच्या संवर्धनाचे उपक्रम राबवणे.
६. माहितीचा अधिकार
माहितीच्या अधिकाराचा वापर करून राज्यात मराठीच्या वापराची वस्तूस्थिती जाणून घेणे व त्याआधारे शासनावर मराठीच्या वापरासाठी दबाव आणणे.
७. ई-मराठी
मराठी भाषेला अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाची जोड देणे. संकेतस्थळ, ब्लॉग्ज, इंटरनेटच्याद्वारे मराठीचा प्रसार करणे. सर्वसामान्य जनतेला संगणकावर मराठीच्या वापराचे प्रशिक्षण देणे.
८. मराठी चळवळ
मराठी भाषा व संस्कृतीवरील अन्यायाविरूद्ध आवाज उठवणे. मराठीच्या संवर्धनसाठी शासन तसेच संबंधितांकडे आग्रह धरणे, त्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने, तसेच चळवळीच्या अंगाने प्रयत्न करणे.
अधिक माहितीसाठी www.marathivikas.org या संकेतस्थळाला (उभारणी अपूर्ण) भेट द्या.
मराठी अभ्यास केंद्राचे कार्य- एक दृष्टिक्षेप
मराठी शाळांची पीछेहाट रोखून त्या चांगल्या चालण्यासाठी मराठी शाळांच्या राज्यव्यापी परिषदेचे आयोजन, महाविद्यालयांतील मराठी वाड. मय मंडळांचे भाषासंवर्धनासाठी संघटन व मुंबई विद्यापीठाशी संलग्न प्रत्येक महाविद्यालयात मराठी भाषा व वाड. मय मंडळाच्या स्थापनेसाठी केलेले यशस्वी प्रयत्न, मराठीचा संगणकीय वापर वाढावा यासाठी युनिकोडचा प्रसार व त्याच्या प्रभावी वापरासाठी प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन, विद्यापीठांनी इंग्रजीप्रमाणे मराठीतूनही व्यावसायिक शिक्षण उपलब्ध करून द्यावे यासाठी मुंबई विद्यापीठाकडे केलेला यशस्वी पाठपुरावा, मराठीच्या कालोचित व उपयोजित पाठ्यक्रमांसाठी पुणे विद्यापीठापुढे केलेले सादरीकरण, शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजी भाषा चांगल्या याव्यात यासाठी ग्राममंगल व अन्य संस्थांच्या सहकार्याने हाती घेतलेला द्विभाषा प्रकल्प, माहितीच्या अधिकाराचा वापर करून शासकीय पातळीवर मराठीच्या वापराबाबतचे वास्तव समजून घेणे व त्याद्वारा भाषाधोरण व अंमलबजावणी यांतील विसंगती दूर करणे अशी अनेक कामे मराठी अभ्यास केंद्राच्या गाठीशी आहेत.