मराठीत श, ष आणि स हे तीन स्वतंत्र उच्चार आहेत.
श हे व्यंजन च-वर्गीय म्हणजे तालव्य आहे. 'ष' हे ट-वर्गीय म्हणजे मूर्धन्य आणि 'स' हे त-वर्गीय म्हणजेच दंत्य व्यंजन.
इंग्रजीत च, ज़‌‍‌‌, ज‍, झ, ज्‍ह, श, आणि स या वर्णांना सिबिलंट  म्हणजे हिसिंग आवाजाचे ध्वनी म्हणतात. सापाच्या फुस्‌ आवाजासारखा किंवा विस्तवावर पाणी ओतल्यवर जसा आवाज होईल तसा यांचा उच्चार होतो. इंग्रजीत ष नाही आणि चमच्यातला च देखील नाही..

मराठीत 'ष'ने सुरू होणारे जेवढे शब्द आहेत ते सर्व संस्कृतमधून आलेले आहेत आणि त्या सर्वांचा संबंध सहा या अंकाशी आहे. उदाo षटक, षट्‌कार, षड्‌ज, षडानन,  षण्मुख, षट्‌कोन, षट्‌(सहा), षष्ठ‌(सहावा), षंढ(छक्का), षोडष(सोळा, सोळावा)), षष्टि(साठ), षष्ठी(सहावी तिथी), षष्ट्याब्दीपूर्ती,  वगैरे.
मराठी उच्चारांच्या संकेतांप्रमाणे, च-वर्गीय 'श'ला 'च' जोडता येतो(आश्चर्य), पण ट-ठ-ड-ण नाहीत. तसेच ट-वर्गीय 'ष'ला ट-ठ-ण जोडता येतात पंण च नाही. याच नियमाने त-वर्गीय 'स'ला त-थ-द-न  जोडता येतात पण च, ट नाहीत. (हा नियम फक्त मराठी शब्दांसाठी आहे, इंग्रजीसाठी नाही!)
त्यामुळे एक सोपा नियमः ट/ठ/णला जोडायचे असेल तर "ष"च हवा. त्यामुळे गोष्ट, स्पष्ट, शिष्ट, वैशिष्ट्य, वरिष्ठ, ज्येष्ठ, श्रेष्ठ, उष्ण, कृष्ण, तृष्णा, वगैरे शब्द बनतात.  या शब्दांचा उच्चार करताना 'ष'चा योग्य उच्चार आपोआपच होतो असा अनुभव आहे. .
श-ष-स या तिन्ही अक्षरांना तत्त्वतः य-र-ल-व-श-ष ही व्यंजने आणि क-प-फ-म-न हे जोडून मराठी शब्द बनतात.
उदाo अश्या, आयुष्य, सस्य;  स्पर्श, वर्ष,  श्री(श्‍री);  अश्लील, अश्‍व, निश्शंक;  स्राव(स्‍राव), अस्लम, स्वगत,  अश्क, कनिष्क, बाष्प, निष्फळ, प्रश्न(प्रश्‍न) इत्यादी.  त्यामुळे असल्या शब्दांचा उच्चार करताना श-ष-स चा गोंधळ होऊ शकतो, तो फक्त प्रयत्‍नाने आणि अनुभवानेच टाळायला हवा.
फारसीतून आलेले मराठी शब्द श-ष या दोघांचा वापर करून लिहिता येतात. खुश, खूष; पोशाक, पोशाख; हुशार, हुषार; शौक, षोक, इ.
ट-ठ-ण ला जोडता येतो तो 'ष' असतो, श नाही हे लक्षात ठेवले तरी पुष्कळ होईल.