वेगवेगळ्या विसावाच्या कल्पना 'झोपे' वर येऊन रेंगाळतात हे नक्कीच; म्हणजे तसं म्हटलं तर विश्रांती ही झोपे शिवाय पूर्ण होऊच शकत नसावी. पण तरीही वेगवेगळी कामे करताना काही क्षणांसाठीची विश्रांतीही परत कामाला हुरूप आणते. एंडोस्कोप्स रिपेअर करताना सतत डोळे ताणून काम करावे लागते मग तासाभराच्या कामानंतर छोट्या मध्यांतराची आवश्यकता पडली की, 'घोटभर चहा आण रे' म्हणत चांगला अर्धा कप चहा ढोसायचा व एक दोन झुरके घेतले की, परत काम एके काम! किंवा चहा नकोसा वाटत असेल तर आजकाल एक मनोगत वरची फेरीच बरी वाटते. मध्येच एखादा घरी फोन केला की 'घरच्या' गप्पांनी पण एक आगळा वेगळा ब्रेक मिळतो. फिल्डवर तर विश्रांतीचा प्रश्नच नाही पण सायंकाळी सर्व कामे आटोपली की, ऑफिसात बसून 'महाजालावरील गप्पा' मन प्रसन्न करतात. घरी गेलं की मुलींशी खेळताना दिवस भराचा सर्व शिण पसार होतो. आठवडाभर असं चाललं की शनिवारी दुपारी लवकर घरी जाऊन तासभराच्या नांवाखाली चांगली तीन तास झोप ठोकायची, सायंकाळी जरा मुलींबरोबर खेळ किंवा फेरफटका काहीच नाही तर मित्रांबरोबर उनाडक्या आहेतच!
रविवार मात्र आळसाचा वार! उशीरा उठायचे, सकाळच्या फेरफटक्याला दांडी, साधारणता सकाळी बाहेरचा नाश्ता (कारण सौ. लाही सुट्टी असते ना !) रविवारी दाढी करून व अंघोळ सकाळी करून रविवारचा अपमान करू नये असे माझे प्रामाणिक मत आहे. खाली यंगस्टर्स मध्ये कॅरम वा टेटे खेळायचं. एखादं चांगलं पुस्तक हातात असेल तर सर्व गोष्टींना माफ करून लोळत पुस्तक वाचत पडायचं ! दुपारी दाबून जेवण व तीन चार तासांची झोप, सायंकाळी परत जवळपासचा फेर फटका व शक्य झाल्यास जवळपासच्या मंदिरात चक्कर ही नेहमीच्या सुटीची रीत झाली.
लागून सुट्टी असली की नजर जाते कॅलेंडर वर अन् वेध लागतात जवळपास कुठेतरी जाऊन यायचे. एक / दोन मित्रांना किंवा जवळील नातलगांबरोबर निघायचे. अन् दोन दिवस मस्त भटकायचं. ठिकाण कोणतंही असो, गर्दी नको हा आग्रह.
माझा शिण घालवायची कल्पना अशी असते !
माधव