बाङ्ला भाषेत श, ष आणि स या तिन्ही अक्षरांचा उच्चार श होतो, असमीया भाषेत तिघांचा उच्चार ख़(=जर्मनमध्ये असतो तसा घशातला ख़, किंवा थोडासा ख़तरनाक, ख़बर, ख़राब मधला ख़) असा होतो, तर उडिया भाषेत स. आणि सौराष्ट्री गुजराथीत तर या तीनही अक्षरांचा ह असा उच्चार होतो. तिथे सासूला हाहू म्हणतात.

भोजपुरीत या तीनही अक्षरांचा साध्या 'ख'सारखा उच्चार. त्यामुळे भोजपुरीत लक्ष्मणचे लखन होते, क्षमाचे खमा, विषाचे विख वगैरे.  नालंदा हा उत्तरी भारतीयांचा कोश असल्याने त्याच्यात 'हल्लीचा ख पूर्वी ष होता असलीच विधाने' येणार. मराठीत अजूनतरी ष ला ख म्हणत नाहीत. शेंडीफोड्या श, अस्सल संस्कृत पोटफोड्या ष, गोलमटोल ल, आणि ज्ञचा द्‌न्‌य असा उच्चार ही फक्त मराठीचीच वैशिष्ट्ये आहेत.  चमच्यातला दंततालव्य च, तसलाच छ, ज़ आणि झग्यातला झ, मराठीव्यतिरिक्त इतरही काही भाषांत आहेत.