संस्कृतमधल्या स्था-तिष्ठ या धातुवरून मराठीत पुष्कळ शब्द आले आहेत. ठेला/ठाकला=उभा राहिला,ठिकाण=विशिष्ट स्थान,ठिय्या देणे=एकाच ठिकाणी बैठक मारून राहाणे, गोठा=गोस्थान अर्थात गुरे ठेवण्याची जागा,ठाण,ठाणे,गुजरातीतले स्थळनाम ढाणुं=मराठी डहाणू, हिंदीतले ठाडे रहियो, प्रयोजित स्थापय वरून ठेव,ठेवणे,ठेवीदार इ. इ.
ठाय आणि ठाव हे भाऊ-भाऊ किंवा काका-पुतणे असू शकतात. य आणि व ची अदलाबदल झालेली एक शब्द-शृंखला इथे मांडावीशी वाटते. चूर्ण म्हणजे पूड,भुकी हे आपल्याला माहीत असते. पण नारळाचे चूर्ण ह्या लघू अर्थाने चूर्ण शब्द कसा बदलत गेला ते पहा. दक्षिण कन्नडा मध्ये चूर्ण ला चुन्न म्हणतात. थोडे उत्तरेकडे त्याचे चून किंवा चोन होते. गोव्यामध्ये ते सोंय(उच्चार त्सोंय, चोंय, सोंय ह्यामध्ये कुठेतरी) होते. उत्तर कोंकणात हा शब्द चोय, चोव, चव असा वापरतात. पाकक्रियेवरच्या जुन्या मराठी पुस्तकातून नारळाचा चव असाच प्रयोग आढळतो.सध्या मात्र किसलेला ओला नारळ असे भले मोठे नाव छापील माध्यमातील रेसीपीज मध्ये दिसते.
केवळ भारतीयच नव्हे तर अनेक इण्डोयुरोपीय भाषांमधून स्था-तिष्ठ शी संबंधित अनेक शब्द दिसतात. ते संस्कृतपूर्व अश्या एका आदि(प्रोटो इण्डोयुरोपियन) भाषेतल्या शब्दावरून आले आहेत. इंग्लिश stand,state,static,station,stationary, German stehen असे शब्द दाखवता येतील.