वापरकर्तानुकूल हा यूज़रफ़्रेन्डली नाही असे का वाटावे? मला तरी छान वाटला. ज्यांना भावला नसेल त्यांच्यासाठी प्रयोगसुलभ, वापरसुलभ, प्रयोगशील किंवा वापरण्याजोगा हे शब्द आहेतच. एका इंग्रजी शब्दाला अनेक प्रतिशब्द ज़रूर असावेत. जे टिकतील ते सर्व रूढ होतील. एकाच शब्दात अर्थ व्यक्त होत नसेल व दोनतीन शब्द एकापुढे एक ठेवून जर सुयोग्य आणि अचूक आशय व्यक्त करता येत असेल, तर तसे करावयासही प्रत्यवाय नसावा.
कषायपेयपात्र हा स्पेसिफ़िक म्हणजे चहापुरताच वापरण्याजोगा आहे, हा त्या शब्दाचा गुण की अवगुण? गडू, लोटा, साटके, लोटके, गाडगे, वाडगा, कुंडले, चंबू, झारी रोज लागत नाहीत. चहाचा कप मात्र रोज लागणार, तेव्हा त्याच्यासाठी स्पेसिफ़िक शब्द असणे हितावह. सततच्या वापराने कदाचित प्रयोगसह्य वाटेलही.