ऱ्हस्व, दीर्घ आणि प्लुत अशी तीन परिमाणे आहेत... शुद्ध मराठी यांनी दिलेले स्पष्टीकरण योग्यच आहे. वैदिक मंत्रांचे उच्चारण करण्यासाठी अक्षरांवर खुणा केलेल्या असतात. वैदिक वाङ्गमयातील चौदा विद्यांतील पांचवी विद्या 'शिक्षा' (चार वेदांनंतरची) असून त्याविषयी असलेल्या एका लेखात (चौदा विद्या चौसष्ठ कला- लेखन, संशोधन, संकलन डॉ. श्रीमती मडिमन) खालीलप्रमाणे खुलासा केलेला आहे -
'... प्राचीन गुरू मंत्रोच्चारणाबाबत जागरूक असत. तैत्तिरीय उपनिषदात शिक्षेची सहा अंगे सांगितली आहेत. वर्ण, स्वर, मात्रा, बल, साम व संतान. वर्ण म्हणजे अक्षर. वेदांच्या ज्ञानासाठी संस्कृत वर्णमालेचे ज्ञान आवश्यक आहे. स्वर - उदात्त, अनुदात्त व स्वरित असे तीन स्वर आहेत. उच्च स्वराला उदात्त, नीच स्वराला अनुदात्त व दोघांच्या मधल्या स्वराला स्वरित म्हणतात. मात्रा - स्वराचा उच्चार करायला जितका वेळ लागतो त्याला मात्रा म्हणतात. ऱ्हस्व, दीर्घ व प्लुत असे मात्रेचे तीन प्रकार आहेत. एक मात्रा म्हणजे ऱ्हस्व, दोन मात्रा म्हणजे दीर्घ व तीन मात्रांच्या उच्चाराला जितका वेळ लागतो त्याला प्लुत म्हणतात. बल - बल म्हणजे वर्णोच्चाराचे स्थान होय. साम - याचा अर्थ साम्य असा होतो. दोषरहित माधुर्यादी गुणांनी युक्त अशा उच्चाराला साम म्हणतात. संतान - संतान म्हणजे संहिता अर्थात् पदांचे सानिध्य म्हणतात. ते असले की पदांचा संधी होतो.
' प्रत्येक वेदात वर्णांचा उच्चार एकाच प्रकारे होत नाही. त्यामुळे प्रत्येक वेदाचा स्वतःचा शिक्षाग्रंथ असतो....'
मंत्राक्षरांची बलस्थाने निर्देशित करण्यासाठी ' किंवा _ (उच्च वा नीच ) अशा खुणा केलेल्या असतात. ऋग्वेदीय उच्चार परंपरेप्रमाणे बलस्थानी मानेला वर किंवा खाली झटका देऊन उच्चार केले जातात. यजुर्वेदीय मंत्रोच्चार करताना हाताचा वापर करतात. अक्षरापुढे दिलेला अंक हा अक्षरांती जो स्वर आलेला असतो, त्याचा उच्चार लांबविण्यासाठी निर्देश करणारा असतो.