दुव्यावर ऐकू आलेले उच्चार मला फार चांगले वाटले नाहीत, उत्तर भारतीय माणसाने केलेले असावेत. ऋ, ॠ, ऌ,  हे उच्चार मला अनुक्रमे अरि‌, रीऽ, क् आणि खऽ असे ऐकू आले.  श आणि ष च्या उच्चारात फरक जाणवला तरी ष चा उच्चार सुधीर फडक्यांच्या किंवा चारुशीला गुप्त्यांच्यासारखा शुद्ध वाटला नाही.
 ऋ चा मूळ उच्चार काय होता  कोण जाणे, पण हल्लीच्या मराठीत ऋचा उच्चार रि आणि रु यांच्या मधला करतात.
श्र हे श्‌ आणि र यांनी मिळून झालेले जोडाक्षर. 'श'चा तळाचा शेपटा त्याच्या स्वरदंडाच्या दिशेने झुकता असल्याने त्याला (क्रप्रमाणे) 'र'ची तिरपी रेघ जोडता येत नाही.  जोडल्यास ती स्वरदंडाला चिकटेल व अक्षर विचित्र दिसेल.   'र'ची जोडणी सुलभ व्हावी म्हणून एका खास अर्ध्या 'श'ची निर्मिती आपल्या पूर्वजांनी केली. तसला श आणि अन्य अक्षरे जोडून श्र(श्‍र), श्व(श्‍व), श्च(श्‍च), श्न(=श्‍न), श्ल(श्‍ल),  अशी नेहमी लागणारी उभ्या जोडणीची जोडाक्षरे तयार झाली.  'स'चा स्वरदंड आणि त्याचा 'र'सारखा दिसणारा भाग हे एका आडव्या दांडीने विलग केलेले असतात.  त्यामुळे 'स'ला र जोडता येतो आणि स्र(स्‍र) बनतो. जुन्या पद्धतीच्या 'ख'मधल्या 'र' आणि 'व' मध्ये अंतर असल्याने र जोडणे सोपे होते, आणि तो ख वापरून लिहिलेले ख्रिस्त(ख्‍रिस्त) सारखे शब्द वाचता यायचे. आता भारत सरकारच्या आज्ञेमुळे र आणि व चिकटून केलेला ख मराठीच्या माथी मारला गेला, आणि महाराष्ट्र सरकारने त्याला निमूटपणे मान्यता दिली असल्याने आपल्याला खिश्चन आणि ख्रिस्ती असले शब्द सुवाच्य लिहिता येत नाहीत.
श्र चे शब्द अनेक आहेत. श्रद्धा, श्रावण, आश्रित, श्री, श्रुत, शुश्रूषा, श्रेय, श्रोत, श्रौत  वगैरे. त्या खास अर्ध्या'श'चे आणखी शब्द: विश्व, आश्चर्य, प्रश्न, अश्लील वगैरे.
शृ(श‍ृ )ची गोष्टच वेगळी आहे. हे जोडाक्षर नाही. कारण श्+ऋ यातील ऋ हा स्वर आहे.  त्यामुळे शृ हे 'श' च्या सोळाखडीतले  अक्षर आहे.  जे अक्षर उच्चारताना मागील अक्षरावर आघात येतो त्या अक्षराला जोडाक्षर म्हणतात. द्वादशशृंगी हा शब्द उच्चारताना शृच्या अगोदरच्या 'श'वर जोर आला नाही, म्हणून शृ जोडाक्षर नाही. या शृचे शब्द त्या मानाने थोडे आहेत. शृंग, शृगाल, शृंगार, शृंखला, शृंगाटक(=चव्हाटा/चवाठा/शिंगाडा) इत्यादी. माझ्या आठवणीप्रमाणे इतक्याच मराठी शब्दांत शृ येतो, बाकी सर्व ठिकाणी श्रु‌ येणार..