उपयुक्त गोष्ट असेल तर ती करायला पैसा मिळतो. सोवळ्यात तसे काहीही नसल्याने त्यावर संशोधन झाले नाही. संशोधक, वैज्ञानिक दृष्टीचा पूर्ण अभाव हे खरे कारण. न्यूनगंड वगैरे काही नाही. एडिसन आणि अशा अनेक वैज्ञानिकांनी हलाखीच्या परिस्थितीत चिकाटीने संशोधन करुन क्रांतिकारी शोध लावले आणि पैसा नंतर मिळवला असा इतिहास आहे. तेव्हा ही सबब लंगडी आहे.
हळदीचे गुणधर्म हे कुण्या फ्लेमिंग वा पाशचरसारख्यांनी अल्पावधीत शोधले नसावेत. ते अनेक वर्ष वापरल्याने माहित झाले असावेत. तसे नसेल तर हा शोध कुणी लावला ते कृपया सांगा. त्यातील जंतुनाशक गुणधर्म तर आपल्याला माहित असणे शक्य नाही कारण जिवाणू विषाणू हेच आपल्याला माहित नव्हते. आयुर्वेदात या गोष्टींचा उल्लेख मी पाहिलेला नाही.
पेटंट प्रकरण हे अगदी अलीकडचे. अमेरिकेने समजा पेटंट घेतले तर भारतात जखमेवर हळद भरायला अमेरिकन कंपनीची परवानगी लागली असती असे नाही. केवळ हळदीची औषधे बनवून अमेरिकेत विकायला अडचण आली असती. आणि योग्य तो लढा देऊन आपण दूर केली हे उत्तम झाले.
ओमकाराचे मनोवैज्ञानिक गुणधर्म आपल्याला प्राचीन काळापासून माहित होते ह्याला काय पुरावा आहे?
वैदिक गणित हे त्या काळातील गणिताच्या तोडीस तोड होते. कदाचित थोडेसे पुढेच असेल. पण आजच्या काळातील गणिताला नवीन काही शिकवेल असे त्यात काय आहे? आधुनिक गणितातील न उकललेली प्रमेये वैदिक गणित वापरुन सोडवली असे मी तरी वाचलेले नाही. कुणाला माहित असेल तर सांगा.