व्हॉल्यूमला घनफळ हाच रूढ प्रतिशब्द आहे, त्यामुळे आकारमान म्हणजे साइझ हे नक्की. आकृती म्हणजे डायग्रॅम.
ऍस्पेक्ट रेशोमध्ये ऍस्पेक्टचा मूळ अर्थ आलेला नाही हे पटण्यासारखे आहे. कुठल्याही कोनातून पाहिले तरी लांबी-रुंदींचे गुणोत्तर सारखेच असणार, त्यामुळे सन्मुख किंवा अभिमुख या अर्थांचे शब्द प्रतिशब्दात आले नाहीत तरी चालेल. त्यामुळे दुसरा चांगला शब्द सुचेपर्यंत  लांबी-रुंदीचे गुणोत्तर असे म्हणणे श्रेयस्कर.
चौकट गुणोत्तरमधील चौकट हा शब्द अगदी योग्य आहे, पण चौकट गुणोत्तर म्हटले की अर्थ सहजगत्या स्पष्ट होत नाही. त्यापेक्षा चौकटमान चालला असता. मान किंवा प्रमाण म्हणजे तौलनिक माप किंवा प्रपोर्शन; इथे चौकटीच्या बाजूंचे तौलनिक माप अर्थात्‌ चौकटमान.
पैल शब्द प्राकृत भाषेतून मराठीत आला, म्हणजे मूळ संस्कृतपासून निघून बहुधा अनेक रूपान्‍तरे झाल्यावर. मूळ संस्कृत शब्द कदाचित पारः/पारं/पारे (म्हणजे पैलतीर, पलीकडे) असावा..  पारंगत म्हणजे पलीकडे पोहत गेलेला, अध्ययन पूर्ण केलेला..इसपार-उसपार सारखेच ऐल-पैल झाले असतील... पैलू मात्र तसा नाही; तो सरळ पहलू या फारशी शब्दाचे मराठीकरण होऊन मराठीत रूढ झालेला शब्द.म्हणजे पैल आणि पैलू यांच्यांत तसे काहीच साम्य नसावे. पैलू म्हणजे कंगोरा. कोन, छटा, बाजू वगैरे.