कथा १९१९ पूर्वीची आहे. नात्झी पार्टी १९१९ मध्ये स्थापन झाली इथे वाचा. तिचा नेता हिटलर लोकशाही मार्गाने ३० जानेवारी १९३३ रोजी निवडून आला, पुढे सर्वाधिकारी झाला. गेस्टापो १९३४ मध्ये स्थापन झाली इथे पहा आणि ज्यूंच्या छळाला तेथपासून सुरूवात झाली. १९१९ पूर्वीच्या काळात या गोष्टी नव्हत्या. ज्यूंचा छळ असलाच तर कमी प्रमाणात असावा. हिटलरने ज्या प्रमाणात सुरू केला तेवढा नक्कीच नव्हता.
आता या पार्श्वभूमीवर पुढील वाक्ये बघा.
नात्झी अधिकाऱ्यांनीं मॅक्स प्लांककडे चौकशी केली कीं हा आईनस्टाईन करतो तरी काय. या ज्यू माणसाचा जर्मनीला काय उपयोग आहे? गुरुत्त्वाकर्षणाच्या संशोधनानें पैसे कसे काय मिळतील असेंही विचारलें. मॅक्स प्लांक म्हणाला कीं न्यूटनसारख्या जगांतल्या सर्वश्रेष्ठ इंग्रज शास्त्रज्ञाला आपण चूक ठरवलें तर तो जर्मनांचा मोठाच विजय ठरेल.
एका नात्झी अधिकाऱ्यानें आईनस्टाईनकडे एकदां एक जाहीरनामा आणला.
नुकत्याच स्थापन झालेल्या (कदाचित अजून स्थापनही न झालेल्या) पार्टीचा अधिकारी एकदम सत्ताधीशाच्या थाटात शास्त्रज्ञाची चौकशी करू शकतो? किंवा त्याला जाहीरनाम्यावर सही करायला भाग पाडू शकतो?
वर्तमानपत्रांत एक बातमी. बेल्जियममध्यें इप्र येथें जर्मनांनीं क्लोरीन हा घातक विषारी वायू वापरून अख्खी केंब्रिज रेजिमेंट मारली. मोठ्या संख्येनें माणसें मेलीं. सुमारें १५, ०००. एकही बचावला नाहीं. मृतांत रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या प्रमुखांचा मुलगा रेमंड होता. धार्मिक एडिंग्टन शोकाकुल. मग देव कुठें होता असे त्यानें उद्गार काढले.
-------------
वर्तमानपत्रांत या संहाराचें वृत्त वाचून आईनस्टाईननें बर्लिनच्या प्रशियन वैज्ञानिक परिषदेंत जाऊन भर सभेंत जर्मनांची निर्भर्त्सना केली. हिटलरची आणि गेस्टापोंची दहशत असून देखील.
ही घटना १९१६ सालची आणि पहिल्या महायुद्धातली आहे इथे वाचा. त्यावेळी हिटलर आणि गेस्टापोंची दहशत?
त्यानें लगेच एडिंग्टनला पत्रोत्तर लिहिलें. पण गेस्टापोंनीं त्याला पत्रपेटीकडे देखील जाऊं दिलें नाहीं. शेवटीं त्यानें मॅक्स प्लांकला तें पत्र केंब्रिजला पत्रपेटींत टाकायला विनंती केली. प्लांकनें तें पत्र पत्रपेटींत टाकलें.
गेस्टापोची स्थापना १९३४ ची. तरी १९१९ मध्ये आईनस्टाईनने लिहिलेले पत्र पत्रपेटीपर्यंत न जाऊ द्यायला गेस्टापो जबाबदार?
पण हाय! एका लोकशाहीवादी ब्रिटिश साम्राज्याचा नागरिक असलेल्या शास्त्रज्ञानें जुलमी नात्झी जर्मन शास्त्रज्ञाची उपपत्ती प्रयोगानें सिद्ध केली!
१९१९ मध्ये जर्मनी नात्झी, जुलमी?
एकूण कथा आईनस्टाईन आणि एडिंग्टन यांचे महत्त्व ठसवण्यासाठी लिहिलेली दिसते. आणि या कामासाठी हिटलर, नात्झी, गेस्टापो यांचा वापर करून घेतला आहे. बाकी बुधाच्या गतीबद्दल आईनस्टाईनने दिलेल्या स्पष्टीकरणाबद्दल आधीच वाचल्याने कथेत नावीन्य वाटले नाही.
प्रसिद्ध विज्ञानसाहित्यकार आयझॅक ऍसिमॉव्ह आईनस्टाईनला एका लेखांत ‘ग्रेट जनरल’ आईनस्टाईन म्हणतात. कारण बहुतेक वैज्ञानिकांच्या तर्काधिष्ठित उपपत्ती कालौघांत आधुनिक तांत्रिक साधनें वापरल्यावर चुकीच्या आढळल्या. उदा. डाल्टनचा अणुसिद्धांत, फ्लॉजिस्टॉन सिद्धांत, इ. इ. पण आईनस्टाईनच्या नंतर आधुनिक तंत्रानें तपासलेल्या उपपत्ती कालौघात अचूकच आढळल्या.
आईनस्टाईनच्या सिद्धांताला फक्त ९० वर्षे होत आहेत. टॉलेमीचे पृथ्वीकेंद्रित विश्वाचे मॉडेल १८०० वर्षे टिकले आणि पुढे चुकीचे ठरले. तेव्हा घाईघाईने निष्कर्ष नकोत. दुसरे म्हणजे आईनस्टाईनचे कॉस्मॉलोजिकल समीकरण किंवा त्याने क्वांटम मेकॅनिक्सवर घेतललेले आक्षेप चुकीचे निघाले. कॉस्मॉलॉजिकल समीकरणात आवश्यकता नसताना केवळ विश्व प्रसरण किंवा आकुंचन पावू नये यासाठी त्याने कॉस्मॉळोजिकल कॉन्स्टंट ठेवला तो विश्व प्रसरण पावत असल्याचे लक्षात आल्याने पुढे चुकीचा निघाला. गतीच्या नियमांमध्ये न्यूटनचे सिद्धांत हे चुकीचे नसून आईनस्टाईनच्या सिद्धांताची स्पेशल केस आहे हे खरे आहे.
विनायक
(संपादित : प्रशासक)