शीर्षक  पाहून स्वा. सावरकरांच्या गाईसंबंधीच्या लेखाची आठवण झालीना?   बहुसंख्य हिंदूंच्या मनात गाईसंबंधी जो पूज्यभाव असतो, तसाच मराठी माणसांच्या मनात चुकीच्या राष्ट्रीयत्वाच्या कल्पनेमुळे हिंदी भाषेबद्दल असतो. हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचा पक्का गैरसमज मराठी माणसाने करून घेतला आहे. मुलायमसिंग, लालूप्रसादांसारखे उत्तरेतील राजकारणी व हिंदी प्रसारमाध्यमे या गैरसमजाला खतपाणी घालून तो अधिक बळकट करतात. त्यामुळे राष्ट्रभाषा (! ) हिंदीला विरोध करणे म्हणजे देशद्रोह असे त्याला वाटते.  काही दिवसांपूर्वी एकेकाळी महाराष्ट्राच्या विधानसभेचे सभापती असलेल्या मधुकरराव चौधरींनीही दूरदर्शन वाहिनीवरील  कार्यक्रमात हिंदी राष्ट्रभाषा असल्याचे सांगितले. Official Language म्हणजेच राष्ट्रभाषा असा मराठी माणसाचा गैरसमज झालेला दिसतो. मराठी ही महाराष्ट्राची Official Language आहे. म्हणजे ती महाराष्ट्राची राष्ट्रभाषा आहे? नागपूर विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषविलेल्या डॉ. वि. भि. कोलत्यांचे मराठीच्या अस्मितेचा शोध (श्रीविद्या प्रकाशन) हे पुस्तक वाचा. डॉ. कोलते कुणी सामान्य दुराग्रही मराठीवादी नव्हते. हिंदीचा प्रसार व प्रचार करण्यासाठी त्यांनी आयुष्यातील काही काळ घालवला होता. त्याचप्रमाणे तत्कालीन मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री (तेच! केवळ आपल्या प्रांतातच इंग्रजी हटवून महाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांचे नुकसान करून त्यांच्यात न्यूनगंड निर्माण करणारे!) बाळ गंगाधर खेर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या पहिल्या भाषा आयोगाचा अहवाल व विशेषकरून त्याला डॉ. सुनितीकुमार चटर्जी व डॉ. सुब्रमण्यम यांनी जोडलेल्या भिन्न मतपत्रिकाही वाचा. म्हणजे  खरी वस्तुस्थिती  लक्षात येईल. त्रिभाषासूत्र धाब्यावर बसवून आक्रमक हिंदी नोकरशहानी केंद्रशासनाच्या महाराष्ट्रातील कार्यालयात हिंदी लादायला कशी सुरूवात केली आहे हे रेल्वे स्थानकांवरील सूचनाफलक पाहिलेत तरी कळून येईल.