हिंदी संपर्क भाषा, ज्ञान भाषा नव्हे!  या मथळ्याचा अर्थ समजला नाही. हिंदी ही संपर्क भाषा आहे की नाही? क्रियापद नसल्यामुळे मथळ्याचा अर्धा भाग निरर्थक आहे.  हिंदी ज्ञानभाषा नाही असे लेखकाचे मत आहे. पण का? आज हिंदीत जेवढे वैचारिक वाङ्मय प्रसिद्ध होत असते, त्याच्या निम्म्यानेही मराठीत होत नाही. इतिहास, तत्त्वज्ञान या विषयांची किती पुस्तके नव्याने मराठीत प्रसिद्ध होतात? संस्कृतचा सखोल अभ्यास करायचा असेल तर एक तर जर्मन यावे लागेल किंवा हिंदी. मराठीतून संस्कृतसंबंधी पुस्तके मिळण्याची अगदी वानवा आहे. अर्थात हिंदी ही एकमेव ज्ञानभाषा नाही. भारतातील तमिळसारख्या इतर भाषाही ज्ञानभाषा आहेत.

आणि हिंदी संपर्क भाषा का नाही?  लोकांना चांगले हिंदी बोलता येत नसेल, पण भारतात सर्वत्र हिंदी समजते. मराठी लोकांना धड मराठी येत नाही तर ते हिंदी काय बोलतील? तरीही त्यांना हिंदी समजते. ही किमया हिंदी चित्रपटांनी केली आहे. भारतात हिंदीइतकी चांगली दुसरी संपर्क बोलभाषा नाही.

ऑफ़ि‌शियल भाषा म्हणजेच राष्ट्रभाषा असा मराठी माणसांचा गैरसमज आहे, हा गैरसमज आहे. ऑफ़ि‌शियल भाषेसंबंधीच्या या विधानाला काही आधार आहे असे वाटत नाही. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही हे जितके सत्य आहे, तितकेच ती सरकारी कामकाजाची भाषा नाही हे आहे. कामकाजाची भाषा हिंदी करावी असा केंद्र सरकारचा प्रयत्‍न आहे, त्याला अजून मनासारखे यश प्राप्त झालेले नाही. जेवढ्या प्रमाणात महाराष्ट्रात राज्यकारभारात इंग्रजी भाषेचा वापर होतो तसाच तो, थोड्या कमी प्रमाणात का होईना, हिंदी प्रदेशांत होतो. मराठीत तर अजून जाहिरातीही लिहिल्या जात नाहीत.  त्या अगोदर इंग्रजी किंवा हिंदीत लिहिल्या जातात आणि मग त्यांचे चुकीच्या मराठीत भाषान्‍तर केले जाते, हा आपला रोजचा अनुभव आहे. राष्ट्रीय उत्पादनाची शुद्ध मराठीत लिहिलेली एक जाहिरात जरी दूरदर्शनवर किंवा वर्तमानपत्रात आढळली तरी ती मनोगतावर प्रसिद्धीला द्यावी, असे माझे आवाहन आहे.

हिंदी राष्ट्रभाषा नसली तरी ती एक चांगली, उपयोगी आणि मराठीभाषकांना सहज शिकण्याइतपत सोपी भाषा आहे, ती जरूर शिकावी आणि योग्य तेव्हा वापरावी. जो आशय मराठी शब्दांनी स्पष्ट करता येत नाही, त्यासाठी हिंदीतून शब्द आयात करावेत आणि ते मराठीत मुरवावेत. इतर भारतीय भाषांतून आयात केलेले संपूर्णपणे अपरिचित शब्द आत्मसात करणे मराठीभाषकांना फार जड जाते.