आत्महत्येचं मूळ कारण म्हणजे भविष्यकाळ अंधारून येणं हे आहे. आता जगणं इतकं अवघड आहे की संपून जाण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही असं वाटणं हे आहे. कुटुंब आणि समाज व्यक्तिमत्व घडवतो आणि प्रत्येक व्यक्तीला व्यक्तिमत्व घडवण्या शिवाय काहीही पर्याय नसतो. मानवी जीवनाची ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. मायकेल जॅक्सन सारखा जगप्रसिद्ध गायक अवघे जग जिंकून सुद्धा शेवटी निराश होतो. व्यक्तिमत्व घडले तरी निराशा आणि नाही घडले तरी निराशा हा मानवी जीवनाचा मूलभूत प्रष्ण आहे. व्यक्तिमत्व हेच बंधन आहे आणि ते जगणं असहाय्य करून टाकतं मग समाजात तुम्ही यशस्वी व्हा किंवा अयशस्वी व्हा त्यानी काहीही फरक पडत नाही.

जगण्यातला रस कायम राहणं हे जगण्याचं रहस्य आहे! मुलाला पैसा कळण्यापूर्वी त्याचा कल शोधला तर मूल त्यानी निवडलेल्या क्षेत्रात रमू लागतं. माझ्या मुलाला मी तो दहा वर्षाचा असताना माझ्या व्यवसायात येशील का असं विचारलं तेंव्हा त्यानी मला चित्रकार व्हावसं वाटतं असं सांगीतलं. मी अक्षरशः शैक्षणीक वर्षाच्या मध्यात त्याची शाळा बदलून त्याला घराजवळच्या शाळेत घातलं  आणि तू झेपेल इतकाच अभ्यास कर दहावी वगैरे सगळं आपण बघू असं सांगीतलं. घरच्यांपासून त्यानी सोडलेल्या अत्यंत प्रख्यात शाळेच्या प्रिन्सिपल पर्यंत (आणि मजा म्हणजे त्यानी स्वतः सुद्धा) मला नकोनको करून सोडलं. पण पहिल्या दिवशी घराजवळच्या शाळेतून तो जेंव्हा रमत-गमत घरी आला आणि मी त्याला कसं वटतयं विचारल्यावर त्यानी मला जी मिठी मारली ती मी कधीही विसरणार नाही. एकदा त्याला त्याचा कल कळल्यावर त्यानी इतर क्षेत्रात सुद्धा इतकी लोकप्रियता मिळवली की मला संगोपनाचं रहस्य उलगडलं. मूल बहूआयामी व्हायला हवं तरच त्याच्या जीवनातला रस उत्तरोत्तर वाढत जातो! मी ही गोष्ट इतक्या पालकांना (आणि आता इथे) आवर्जून सांगीतली पण कुणालाही रिस्क नको असते.

हीच गोष्ट मग व्यक्तिमत्व घडल्यावर चालू राहते. आपण एकच दिवस पुन्हापुन्हा जगत राहतो मग नैराश्य येतं. मी स्वतः सुद्धा जेंव्हा लोकांना आता पुढे काही नाही असं वाटतं त्या वयात पोहायला शिकलो, आता मला पाणी आणि जमीन यात काहीही फरक वाटत नाही, संगीत शिकलो, टेबल टेनीस शिकून आमच्या इंस्टिट्यूटच्या स्पोर्टस इव्हेंट मध्ये टायटल मिळवलं (जिथं माझ्या निम्या वयाच्या मुलांशी मला सामना करायचा होता), जगातलं सगळ्या अध्यात्माचे सगळे पैलू आत्मसात केले, योगा शिकून उत्तम लवचिकता अंगी आणली, आता मुला कडून चित्रकला शिकणार आहे,  विनोदी साहित्य आणि सिनेमे हा तर माझा अत्यंत जिव्हाळ्याच विषय आहे,  वैविध्यपूर्ण पदार्थ आणि त्याला मजबूत भूकेनी दिलेली दाद हे तर जीवनाचं फार मोठं दालन आहे, स्वतःच्या व्यवसायात तर प्राविण्य आहेच आहे. मला प्रत्येक क्षण जगण्यासाठी उपलब्ध झाला. 

प्रत्येकानी (मग वय काहीही असो) आपल्याला काय आवडेल ते सक्रिय सहभागानी करणं हा जीवनात रस टिकवण्याचा मार्ग आहे. नुस्ती गाणी ऐकायला आवडतात हा निष्क्रिय सहभाग आहे, वाद्या वाजवता यायला हवं, मग कोणतही गाणं ऐकलं की काय काँपॉझिशन आहे, कसं बसवावं हा विचार सुरू होतो. जीवनाचा एकेक दरवाजा उघडावा लागतो मग चोवीस तास रंगतात आणि एखाद्या उत्कट क्षणी समजतं अरे! आपण व्यक्तिमत्वातून मुक्त आहोत, क्रिया आपल्याला बांधत नाही, आपण मरत नाही, शरीराला काहीही झालं तरी आपण जसेच्या तसेच रहातो!

संजय