आजचं युग हे स्पर्धेचं आहे, असं म्हणत आपण चुकीच्या पद्धतीने हे त्याला सांगत तर नाही ना ? स्पर्धा पूर्वी नव्हती का ? रामायण, महाभारत काळापासून स्पर्धा होत्या, आहेत आणि राहणार. फरक इतकाच पडला की पूर्वी प्रसारमाध्यमे इतकी प्रभावी नव्हती त्यामुळे ते जाणवत नव्हतं, दुसरं म्हणजे, लोकसंख्या वाढली आणि व्यवसायाच्या संधीसुद्धा. पण हे आपण लक्षात कुठे घेतो? प्रत्येकाला इंजिनिअर बनण्यात रस नसतो, पण केवळ पैसा मिळतो म्हणून मुलाला "इंजिनिअर" बन असा धोशा लावला जातो. त्यापेक्षा मुलाला प्रत्येकवेळी "तुला ज्यात मजा वाटेल, जे काम करताना तुला थकवा जाणवणार नाही, असे क्षेत्र तू निवड, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. पैसाच सगळं काही नाही" असं नेहमी त्याला सांगणे आवश्यक आहे.
या सर्वांपेक्षा तो काय म्हणतोय ते ऐकणे अधिक महत्त्वाचे वाटते मला. मुलांना खूप गोष्टी सांगायच्या असतात, त्यातून त्यांना येणारा ताण कमी करायचा असतो. ह्या गोष्टीतूनच मुलगा कसा वाढतोय, त्याच्यावर कोणते संस्कार होतात हे कळू लागते.
बरेचदा मुलाला एखादा विषय किंवा शिक्षक आवडत नसतो, पण जसं जेवण केवळ गोड असून चालत नाही, तर सगळ्याच चवीचं जेवण घेतलं पाहिजे, असं आपण समजवून सांगतो किंवा कडू असले तरी औषध घ्यावे लागते, तसंच नावडता असला तरी विषय शिकावा लागतो, तो मेंदूच्या विकासासाठी चांगला असतो, हे सांगता येईल.
इतकंच नव्हे तर त्याला स्वतःला तो जे काही करतोय त्याचा अभिमान वाटला पाहिजे, जो आधी त्याच्या पालकाला वाटला पाहिजे. मग ती अगदी छोटीशी गोष्ट का असेना.
दोन उदाहरणे देतो.
१. आमचे शेजारी :- देशमुख सर, तुमचा मुलगा सकाळपासून संध्याकाळपर्यंत कादंबऱ्याच वाचत असतो, इतकं वाचणं करणं बरोबर नाही, तुम्ही त्याला काहीच का म्हणत नाही ?
माझे वडील :- तुमचा मुलगा सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसता पानटपरीवर गुटखा खात असतो, पण मी काही बोललो का ? त्या गुटख्यापेक्षा पुस्तकं चांगलेच आहे नं?
शेजारी चूप.
२. बाबांचे सहशिक्षक :- "विजु, अरे तू इतका हुशार, गोल्ड मेडॅलिस्ट पण काय ते काँट्रीब्युटरी करतो? १००० रुपयाने काय होते आजकाल ? तो शेजारचा ***** बघ, सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला, २५००० कमावतोय. "
मी :- मग काय करू ?
ते :- अरे दुसरी नोकरी बघ, चांगल्या पगाराची.
मी :- तुमच्या घरी येतो उद्यापासून, झाडू-पोचा, भांडे... वगैरे सगळे काम करीन मी, अगदी घरगडीसारखा काम करीन, तुम्ही द्या ११०० रुपये" . (त्यावेळी त्यांचा पगार ७-८००० असावा),
ते- अरे नाही नाही, तसं नाही म्हणायचं होतं मला.
मी :- तुमची दुसऱ्याला नोकरी देण्याची ताकद नाही तर मग बोलता कशाला ? नाहीतर तुम्ही तुमच्या मुलाला पाठवा माझ्या घरी घरकामाला मी देतो १००० रुपये त्याला.
कदाचित हे प्रसंग मग्रुरी वगैरेचे वाटतील, पण असे उत्तर देणे कधी कधी गरजेचे असते. त्यासाठी मुलांमध्ये "मी जे करतोय ते बरोबर करतोय आणि माझे पालक मला सहकार्य करतील, इतकीच भावना गरजेची असते... बस्स...
"मुलांकडे लक्ष देणे" आणि त्याच्यातल्या चांगल्या गुणांना वाव देणे, हे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी केवळ क्लास लावून देणे नव्हे तर क्लासमध्ये काय चालू आहे त्याची अधून मधून चौकशी करणे, शिकलेल्या गोष्टींचे प्रदर्शन (डेमो) मागणे, वगैरे करता येते.
असो... अधिक काही पाहिजे असेल तर पुन्हा लिहेन...