आयुष्य नेहेमी या क्षणात चालू होतं आणि हाच क्षण महत्त्वाचा असतो, आपण पुढचा विचार करत जगतो म्हणून टेंशन्स येतात. खरं तर भविष्यकाळ हा निव्वळ विचारामुळेच निर्माण होतो. जगायला, निर्णय घ्यायला, कृत्य करायला फक्त एकच क्षण असतो आणि तो म्हणजे हा आत्ताचा क्षण.
तुम्ही तुमच्या मुलाच्या भविष्याचा विचार सोडायचं धाडस करा! मुल कशात रमतयं ते बघा किंवा त्याला टेन्शन असेल तर ते कसलं आहे ते बघा, त्याला काय जमत नाहीये ते बघा. मग ते जमवण्याचा काही सोपा मार्ग आहे का ते स्वतः किंवा इतर तज्ञांना विचारून ठरवा. तुम्हाला स्वतःला ते सोपं वाटतय का ते बघा. या जगात कोणतही गोष्ट अवघड नाही फक्त त्यात तुम्हाला रूची हवी आणि रूची नसेल तर ती गोष्ट सोडण्याचं धाडस करा. तुम्ही काय करता आहात या पेक्षा तुम्ही स्वतः महत्त्वाचे आहात हे लक्ष्यात ठेवा कारण तुम्हालाच मजा येत नसेल तर तुम्ही काय करता आहत त्याला कसा अर्थ प्राप्त होईल?
आपण चुकीच्या मार्गानी चाललो आहोत हे समजण्याचे दोनच निष्कर्श आहेत, एक म्हणजे वाटणारा त्रास आणि दोन म्हणजे लागणारा वेळ.
प्रत्येकाची कश्यात न कश्यात तरी रूची असतेच आणि ती पालकांनी कोणताही आर्थिक विचार न करता शोधायला हवी. अभ्यास मोजका ठेवून मुलाला त्याला जे आवडतं ते करायला प्रोत्साहन द्यायला हवं. आणि मजा म्हणजे ते आज, आत्ता करायला हवं. दहावी नंतर, बारावी नंतर, नोकरी मिळाल्यावर, स्वतःच्या पयावर उभं राहिल्यावर, एक तारखेला, सुट्टी लागल्यावर नाही. तुमच्या जीवनात काहीही सार्थक घडत नाही याचं एकच कारण म्हणजे तुम्ही आत्ता फक्त विचार करता कृती करत नाही. विचार फक्त दुसऱ्या विचाराला जन्म देतो, तुमचं आयुष्य काही बदलत नाही. माझे सगळे मित्र अरे आम्हाला तुझ्या सारखं जगायचय म्हणतात मी त्यानां म्हणतो चला या की टेकडीवर फिरायला जाऊ, वैशालीत ब्रेकफास्ट करू, तुमचा मूड असेल तर पोहायला जाऊ, टेबल टेनीस खेळू, नुस्तं लांब अनिर्बंध भटकायला जाऊ, गाणी वाजवू, तेंव्हा ते म्हणतात येस! ठरव केंव्हा करायचं ते! आणि काहीही न करण्याची हा एकच मार्ग आहे, आत्ता काहीही करायचं नाही नुस्तं ठरवायचं! सगळ्यांची सांपत्तीक स्थिती मजबूत आहे पण भीती जाम सुटत नाही.
तुम्ही तुमच्या मुलांचा विचार करता की तुमचा स्वतःचा हा प्रष्ण नाही, प्रष्ण धाडसाचा आहे. माझ्या मुलाचा एकही मित्र आर्ट स्कूलला गेला नाही, मी त्याला साहस दिलं, बायको सुद्धा मुलगा म्हणजे काय शेवटी अधारच शोधते ती पण त्याला कमर्शियल आर्ट तरी कर म्हणत होती पण त्यानी फाईन आर्ट निवडली. मी त्याला सांगीतलं मला तुझी चित्रं आवडतात कुणीही नाही घेतली तर मी तुझी चित्रं विकत घेइन तुला फाइन आर्ट आवडते ना तू तीच निवड आणि तो दोन्ही कडे सिलेक्ट झाला होता. मी व्यक्तीगत गोष्ट एवढ्यासाठी सांगतो कारण शेवटी प्रत्येक निर्णय व्यक्तिगतच असतो. तुम्हाला वैयक्तिकच धाडस करावं लागतं कुणी तरी धाडस केलं आणि तुम्ही टाळ्या वाजवल्या तर त्यानी तुमच्या जीवनात किंवा तुमच्या मुलांच्या जीवनात काहीही फरक पडत नाही.
तुम्ही इंटरनेट वर एवढा वेळ घालवता याचा अर्थच तुमची आर्थिक स्थिती चांगली आहे, तुम्ही फक्त धाडस करा, तुमच्या मुलांना साहस द्या. आणि नुस्ते प्रष्ण विचारू नका त्यातून तुम्ही काय निर्णय घेतला हे कळवा म्हणजे सगळ्याना त्याचा उपयोग होइल, नाही तर ती नुस्ती चर्चा राहते आयुष्य बदलत नाही.
संजय