साखर सम्राट, मद्य सम्राट, दूध सम्राट तसे आता नवे मद्य सम्राट महाराष्ट्रात तयार होणार आहेत. काही ठराविक राजकारण्यांच्या पोराबाळांची, नातलगांची अथवा चमच्यांची सोय लागावी म्हणून शेतकऱ्यांच्या हिताचा कळवळा आल्याचे हे राजकारणी आणि त्यांच्या खरकट्यावर जगणारे विद्वान घसा ताणून सांगत आहेत. धान्यापासून दारू तयार करण्याचा निर्णय अत्यंत घातक आहे आणि त्याचे वाईट परिणाम समाजाला भोगावे लागणार आहेत. अभय बंग यांच्यासारख्या समाजहितैषी व्यक्तीच्या विचारांवर माझा पूर्ण विश्वास आहे. या नालायक राजकारण्यांवर नाही. तिकडे खेड्यापाड्यात गरीब बायका प्रसंगी पोलिसांच्या लाठ्या खाऊन, गुंडांच्या हाणामाऱ्यांना भीक न घालता आणि दारुड्या नवऱ्यांच्या लाथा बुक्क्या सहन करूनही 'आडवी बाटली' आंदोलन निर्धाराने चालवत आहेत आणि त्यांच्या बाजूने उभे राहण्याऐवजी सरकार राज्यात दारूचा महापूर आणू पाहत आहे.
कोणाही सुजाण आणि संवेदनशील नागरिकाने स्पष्ट विरोध करावा, असाच हा निर्णय आहे.