शुद्ध लेखन महत्त्वाचे आहेच पण भाषा चांगली बोलता येणे हे जरा अधिक महत्त्वाचे वाटते. दहा हजारातून एखादाच वक्ता निपजतो असे एक संस्कृत सुभाषित सांगते.विद्वान पंडित मात्र तितकासा दुर्मीळ नाही. तो हजारात एक असू शकतो.माणसांमाणसांमध्ये बोलाचालीच्या व्यवहारापेक्षा लिखापढीचा व्यवहार फार कमी प्रमाणात होतो़. उच्चार व्यवस्थित झाले तर माणसाची चांगली छाप पडते. लेखी परीक्षा बरेच जण उत्तीर्ण होतात पण वाय्वा किंवा मौखिक मध्ये गडगडतात. लिखाण करताना विचार करायला वाव किंवा अवधी असतो तसा तो बोलताना बहुधा नसतो. बोलणे हे उत्स्फूर्त असते. असो. मुद्दा असा की मराठीमध्ये इंग्लिश उच्चार फार बेंगरूळपणे केले जातात. पोलिस-पुलीस, मार्टीर-मार्टर,पायोनिअर-पाय्नीर,ज़्हेब्रा-झ्येब्रा, ज़्हीरो-ज़्ह्यीरो,(हे हिंदी प्रदेशातही आहे-खूपच आहे),कझीन---क-जन इ. शिवाय एखाद्या इंग्लिश व्यंजनापुढे य आल्यास आपण त्याचे द्वित्व करतो़. उदा. प्रोड्ड्युस--प्रोड्यूस, मॅन्न्युफॅक्चर-मॅन्युफॅक्चर,इ.
ऱ्हस्व दीर्घांचे तर विचारायलाच नको. क्लीन चिट चे क्लिन चीट, बीचेस चे बिचेस, रीड चे रिड, नीडचे निड, बँकेतल्या लेजर ऐवजी लीझर, ड्रेजर(वाळू काढणारे यंत्र) ऐवजी ड्रेझर, फार काय, फ्रिज(ज्य) ऐवजी फ्रीज, (आणि फ्रीज्हर ऐवजी फ्रिज्यर!)असे शब्द आपण सर्रास वापरीत असतो.
अर्थात, हिंदी भाषक पट्ट्यापेक्षा आपले मराठमोळे इंग्लिश उच्चार ठीकच म्हणायचे!
ता. क. डब्ल्यू चा उच्चार करताना ओठांचा चंबू करून उ म्हटल्यासारखे करून व उच्चारावा. मला देखील एका अमेरिकन संशोधकाने आमचा डब्ल्यू चा उच्चार खूपच चुकीचा असतो असे सांगून योग्य उच्चार करून दाखवला होता. जुनी तरखडकर पाठमाला मुद्दाम चाळली. तिथे शुद्ध उच्चार स्पष्टपणे लिहून दाखवला आहे.न्यूयॉर्कच्या जे. एफ. के. विमानतळानजीक नेवार्क नावाचा दुसरा विमानतळ आहे. त्याचा उच्चार नौआर्क असा काहीसा करतात आणि आपण तो न्यूयॉर्क समजतो.
ही चर्चा उशीरा वाचनात आली म्हणून पाच वर्षांनी प्रतिसाद पाठवला आहे... यल्गार होsss- च्या धर्तीवर रीवाय्वल होsss