शुद्ध लेखन महत्त्वाचे आहेच पण भाषा चांगली बोलता येणे हे जरा अधिक महत्त्वाचे वाटते.
- असहमत. ह्या मुद्द्याचा परामर्श चित्तने वर घेतलाच आहे, तेव्हा पुनरोच्चार टाळतो.
"वक्ता दशसहस्रेषु" असला तरी वक्तृत्व म्हणजे केवळ शुद्ध उच्चारण नव्हे. अन्यथा प्रमाण भाषा बोलणारे सारेच उत्तम वक्ते असते. ओघवती, रसाळ वाणी, आवाजाचे नाट्यमय चढ-उतार, हजरजबाबीपणा, श्रोत्यांच्या विचारांची व भावनांची नस अचूक पकडता येणे, कॅरिस्मा (ह्यास मराठी प्रतिशब्द सुचला नाही, क्षमस्व) ह्या साऱ्या घटकांचे रसायन जेव्हा सुयोग्य प्रमाणात होते तेव्हाच खरा वक्ता निर्माण होतो.
उच्चार व्यवस्थित झाले तर माणसाची चांगली छाप पडते.
प्रथमश्रवणी पडली तरी त्या सु-उच्चारित उक्तींमागे ज्ञान, अनुभव, शहाणपण इत्यादींचा अभाव जर पुढील संभाषणात दिसून आला तर ती छाप अल्पजीवी ठरते. तसेच केवळ कोकाटेछाप "फाड फाड इंग्रजी" बोलणे म्हणजे चांगले इंग्रजी बोलणे नव्हे.