ञ चा उच्चार मराठीत लोप पावला आहे हे खरे; पण जुन्या नाट्य संगीतातून तो कधी-कधी अभिप्रेत नसतानाही डोकावलेला दिसतो. मा. दीनानाथांचे 'चंद्रिका ही जणू' हे पद ऐकावे. इथे च नंतर न अभिप्रेत आहे पण आलाप घेताना चंवद्रिका..चञंद्रिका. असे काहीसे ऐकू येते आणि ते फार सुश्राव्य असते. तसेच प्रसाद सावकारांचे जय गंगे भागीरथी  ह्या पदात शंकर शंकर जय शिव शंकर म्हणताना अनुनासिकाचा स्पष्ट असा उच्चार ऐकू येतो तोही ऐकावासा वाटणारा आहे.बिंबाधरा मधुरा मधले अनुस्वार सुद्धा असेच गोड वाटतात.मराठी नाट्यसंगीतातल्या जुन्या ध्वनिमुद्रिकांत असे शुद्ध अनुनासिक उच्चार बऱ्याच वेळा आढळतात.