ञ चा उच्चार लोप पावला आहे?
कोण म्हणते, ञ चा उच्चार लोप पावला आहे?  जेव्हा तालव्य च-छ-ज-झ अगोदर अनुस्वार येतो तेव्हा त्या अनुस्वाराचा ञ् हा उच्चार होतोच.  इतकेच नाही तर जेव्हा च, (छ), ज़, झ चा दंततालव्य(दंतमूलीय, वर्त्स्य) उच्चार होतो तेव्हा त्याच्या आधीच्या अनुस्वाराचा उच्चार दंततालव्य ञ् सारखा करायला हवा. जर कुणी तो न् करत असेल तर ते चूक आहे.
नव्याने प्रसिद्ध होणाऱ्या मराठी व्याकरणांत काय वाट्टेल ते छापतात. हल्ली नेहमी वाचायला मिळते की मराठीतून ष या उच्चाराचा पूर्णपणे लोप झाला आहे, आणि काही एखाददुसऱ्या विद्वानांचे उच्चार  सोडले बाकी सर्वत्र  ष चा उच्चार श असाच होतो. हे वाक्य  आंतरजालावर देवनागरी टंकाबाबत जेव्हाजेव्हा लिहिलेजाते तेव्हातेव्हा हटकून वाचायला मिळते. ही सर्व मते हिंदीभाषकांची असतात, आणि ती मराठीभाषकांवर ठोकायचा प्रयत्‍न असतो. उत्तरी भारतीयांना ज़मत नसेलेले उच्चार मराठीतल्या  सामान्य माणसांनाही ज़मत नाही असे समज़णे निखालस द्वेषमूलक आहे.
असाच प्रयत्‍न ळ बाबत होत आहे. अभिजात संस्कृतने सुद्धा वैदिक संस्कृतमधले ळ आणि ळ्ह सोडून त्याचे ड आणि ढ केले तर मराठीने ळ का ज़पावा, असे काही तथाकथित व्याकरणशास्त्रींचे मत आहे, असेही कधीकधी वाचायला मिळते. दीर्घ ॡ संस्कृतमध्ये नाही, म्हणून तो मराठीत नसावा?  जे जे उच्चार तोंडाने करता येतात ते ते सर्व उच्चार लिहिता येण्यासाठी लिपीत जास्तीत जास्त सोय असायला हवी. हे पूर्णतः शक्य नसले, तरी निदान आपला तसा प्रयत्‍न असायला हवा. त्या उच्चाराचा शब्द भाषेत नसेना का!