नैराश्याचं मूळ कारण जीवनात रमायला काही नाही हे आहे. मूल एकदा पैश्याच्या दिशेनी निघालं की जीवन म्हणजे नुस्ती अस्तित्व टिकवण्याची धडपड सुरू होते मग तुम्ही त्याला कसाही रंग द्या. कर्तव्य, जवाबदारी, समाज काय म्हणेल, म्हातारपणची सोय अश्या अनेक सबबी पुढे करत तेच तेच आयुष्य जगत राहावं लागतं. तुम्ही कितीही हसरा चेहेरा ठेवा जगणं म्हणजे निव्वळ बळजबरी झालेली असते. इलाही जमादार  किती प्रामाणिक पणे लिहीतोः

"माथ्या वरी नभाचे ओझे सदा इलाही

दाही दिशा कश्याच्या हा पिंजरा असावा"

एखादाच पैश्याचा विचार न करता स्वतःच्या मर्जीनी जगण्याचं धाडस करतो, स्वतः च्या रमण्याचं विश्व निर्माण करतो. तो जेंव्हा यशस्वी होतो, प्रसिद्धीच्या झोतात येतो तेंव्हा आपण म्हणतो हे कौशल्य उपजतंच असावं लागतं, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. पण पालक म्हणून ते पाय आपण आपल्या मुलाला शोधायला मदत करत नाही हा थ्री ईडियटस चा मेसेज आहे.

फाईव पॉइंट समवन वरून अफलातून पटकथा बेतली आहे. पहिल्या क्षणा पासून चित्रपट जी पकड घेतो ती काय लाजवाब आहे. पुणे ईंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलमधे मी शांतनू मोईत्राला व्यक्तीगत भेटलो, त्याच्याशी मनसोक्त बोललो, सलील चौधरी आणि बिमल रॉयच्या सौंदर्य दृष्टीनी प्रभावीत झालेला आणि त्यांचा वारसा चालवावा असं वाटणारा तो अत्यंत गुणी संगीतकार आहे.  'बहती हवासा था वो' काय गाणं केलय त्यानी! 

नायिकेच्या बहीणीच्या डिलीवरीचा प्रसंग वेगळ्या पद्धतीनं हाताळता आला असता पण ती फार किरकोळ गोष्ट आहे.

अतिशय सुरेख विनोद बुद्धीनी प्रसंग मांडले आहेत. एकेक डायलॉग कळायला दोनदोनदा नुस्ते ऑडिओ ट्रॅक्स ऐकायला लागतात. प्रिंसिपलच्या मुलीच्या लग्नात आमंत्रण नसताना जेवताना पकडले गेल्यावर दुसऱ्या दिवशी दोघं प्रिंसिपलला म्हणतात : सर पर प्लेट रेट काय होता सांगा, आम्ही सगळे पैसे भरतो; लगेच दुसरा त्याला सावरतो, हो सर इन्स्टॉलंमेंटनी! मग पहिला म्हणतो मी परत कोणाच्याही लग्नाला जाणार नाही सर, दुसरा म्हणतो हो सर हा स्वतःच्या ही लग्नाला जाणार नाही. मग परत पहिला म्हणतो सर मी तर लग्नच करणार नाही! असे एकएक प्रसंग रंगवलेत की कमाल वाटते आणि स्टोरी टेलिंगचं सगळ्यात महत्त्वाचं अंग म्हणजे उत्कंठा! ती अशी काय कायम ठेवली आहे की बस देखते रहो.

अमीर खान सारखा सामाजीक बांधीलकीची जाणिव असणारा नट, त्याचा उत्कृष्ट अभिनय, लाजवाब सहजता, बोमेन ईराणी,  माधवन, शरमन जोशी, ओम वैद्य, करीना कपूर यांची सुरेख कामं, लडाख मधे शूट केलेला अप्रतीम शेवट आणि शांतनूच काँटेंम्पररी संगीत! आवर्जून बघावा असा हा सिनेमा आहे.

संजय