थ्री ईडीयटस पाहिल्यावर  हा एक 'वेड'पट आहे असेच वाटले. (त्यावरून झालेली वादावादी म्हणजे तर दुनिया वेड्यांचा बाजार, झांजिबार झांजिबार झांजिबार....  )  
राजकुमार हिरानी उत्तम दिग्दर्शक आहेत याबद्दल वाद नाही. बोमन इराणीचे कामही झकास झाले आहे. आमीर खान वगळल्यास इतर मंडळी अनेक वर्षे एकाच वर्गात शिकलेल्या विद्यार्थ्यांपैकी वाटतात. प्राचार्य सहस्रबुद्धे विद्वान वाटण्यापेक्षा विदूषक किंवा सिनेमाच्या भाषेत सांगायचं तर चक्क 'मोगँबो' वाटतात. विक्षिप्त प्राध्यापक मुन्नाभाई मध्येही होताच. पण तेंव्हा एक गुंड मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतो आणि प्रॉक्झी पेपर्स सोडवून पास होतो म्हणून  प्राचार्यांचा त्या विद्यर्थ्याला असलेला विरोध मान्य करता येण्याजोगा होता.  इथे मात्र हा विरोध पटत नाही. सगळेच शिक्षक फक्त वैयक्तिक आकस ठेवून विद्यार्थ्यासमोर खलनायक म्हणून उभे राहणारे नसतात असेही कुठेतरी दाखवायला हवे होते असे वाटल्यामुळे प्राचार्यांचा हा विनोदी खलावतार खटकला.
एकूणात थ्री ईडियटस ने खूपच अपेक्षाभंग केला हे खरं. त्यातून दिलेला संदेश चांगला असला तरी सिनेमात दाखवलेल्या बऱ्याच गोष्टी न पटल्यामुळे त्या संदेशावर तरी विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न पडला. शिवाय पडद्यावर बाळंतपण दाखवून नक्की काय साधले हेही कळले नाही. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका चोरणाऱ्या मुलांना प्राचार्यांच्या मुलीचे यशस्वी बाळंतपण केल्याबद्दल रस्टिकेशन ची शिक्षा माफ होऊन शिवाय ते गाजलेले पेन बक्षीस मिळते हे बघितल्यावर पेपर फोडा आणि सरांच्या 'गुड बुक्स' मध्ये स्थान मिळेल असे बघा म्हणजे शिक्षा माफ होते असा जर कोणी निष्कर्ष काढला तर त्यात काय चुकले?
देशातल्या काही खरोखरच प्रतिभावान शास्त्रज्ञांचे शोध या सिनेमामुळे जगाला कळले हे मात्र मान्य करायला हवे. पण सिनेमा पाहिल्यावर माझ्या डोळ्यांसमोर
मुन्नाभाई एम बी बी एस + तारे जमीं पर = ३ ईडियटस
असे समीकरण तयार झाल्यामुळे सिनेमा बराचसा पटला नाही आणि फारसा आवडला नाही.