चार वर्षांच्या तुमच्या छबुकलीचं जग अभ्यास, मार्क्स, सराव ह्यांपुरतेच मर्यादित नाहीय हो! तिला त्याची जाणीव आहे का? त्या जगात सुंदर सुंदर प्राणी, पक्षी, निसर्ग आहे; मनोवेधक खेळ, कला, कौशल्य, छंद, गाणी, कविता, रंग, साहित्य, उपक्रम आहेत. तिच्या त्या चिमुकल्या जगात खूप प्रेमळ माणसे आहेत, मित्र मैत्रिणी, नातेवाईक, रोज भेटणारे अनेक लोक आहेत. मोठ्या इमारती, बागा, रस्ते, ट्रॅफिक, वाहने आणि खूप काही.... ह्या जगाच्या शाळेतील शिक्षण सर्वात महत्त्वाचे, हे तिच्या बालमनाला समजावून सांगू शकाल का? स्पर्धेच्या एवढ्या जवळ असलेल्या तिच्या मनाला त्या स्पर्धेच्या वातावरणातून मोकळा श्वास घ्यायला बाहेर काढू शकाल का? तिला निरर्थकातील अर्थ आणि निसर्गाची बाराखडी अनुभवायला द्याल का?
पाव मार्कांच्या क्षुल्लकावरून तिचे मन आभाळात झेपावेल अशी तिची कल्पनाशक्ती समृद्ध करण्याची जबाबदारी घ्याल काय?
सर्वच शाळांतील शिक्षण पद्धती ह्या मुलांशी मैत्र करणाऱ्या असतील ह्याची खात्री नसते. त्यासाठी आपण आपल्या छबुकलीला ज्या शाळेत घालतोय तिथे माणूस घडविला जातो की कारकून, हे तपासून पाहणे आवश्यक आहे. अन्यथा पुढे मनस्ताप होऊ शकतो. अशा अनेक शाळा निघत आहेत, जिथे मुलांना 'प्ले-वे' मेथड ने म्हणजे हसत-खेळत शिक्षण दिले जाते. त्या शाळेत तुम्हाला असे चित्र अभावानेच दिसेल. तणावमुक्त शिक्षण हा मुलांचा हक्क आहे, जो त्यांना देणे हे एक पालक म्हणून आपले कर्तव्य आहे!