अनुबंध,

गझल लिहिण्याचा प्रयत्न चांगला आहे; काही साध्या-सोप्या गोष्टी सांगाव्याशा वाटतायतः

१) सुरेश भटांची 'गझलची बाराखडी' मनोगत, सुरेशभट. इन आणि 'एल्गार' मध्ये उपलब्ध आहे. ती जरूर वाचा.

२) गझल ही वृत्तात - अक्षरगणवृत्त (शक्यतो) किंवा मात्रावृत्तात - असावी. तुम्ही मात्रावृत्त पाळलं आहे असं वाटतं. (काही गझला छंदातही आहेत.)

३) अलामत (स्वरचिन्ह), काफिया (यमक) आणि रदीफ (अंत्ययमक) हे तीन शब्द आणि त्यांचे उपयोग लक्षात ठेवा. तुमच्या गझलेतही ते काही प्रमाणात बरोबर आले आहेतच. दुसरं उदाहरण देतो (मी लिहिलेल्या एका गझलेचं).

श्वास मीही घेत होतो सारखा
दूर मृत्यू नेत होतो सारखा

वृत्त कळता तेच आले धावुनी
दोष ज्यांना देत होतो सारखा!

इथे घेत, नेत, देत हे शब्द काफिये झाले. होतो सारखा ही रदीफ. देत, घेत, नेत या काफियांमध्ये 'ए' हे स्वरचिन्ह (अलामत) आहे. म्हणजेच पुढच्या शेरांमध्ये बेत, येत इ. शब्द चालतील, पण पीत, खात इ. वेगळी स्वरचिन्हं असलेले शब्द चालणार नाहीत.

४) पहिल्याच शेरात अलामत पाळली नसेल, तर पुढच्या शेरांमधून आपोआप त्यांतून मोकळीक मिळते हा एक मार्ग आहे. उदा.

सूर माझा-तुझा जुळेल कधी?
नूर माझा तुला कळेल कधी?

हा जर मतला (गझलेतला पहिला शेर) घेतला, तर पुढच्या शेरांत रुळेल, मिळेल, पळेल इ. शब्द वापरता येतील; पण जर मतल्यातच 'कळेल' आणि 'ढळेल' असे काफिये आले, तर पुढच्या शेरांत रुळेल, मिळेल हे शब्द वापरता येणार नाहीत.

५) मराठीत स्वरांचं यमक असलेले काफिये असावेत की नाही हा एक प्रसिद्ध वाद आहे.  उदा.

तो चेहरा होता
की चंद्रमा होता?

उर्दूत मात्र असे काफिये मान्य आहेत.

- कुमार