बिनाका गीतमालेत सर्व गाणी संपूर्ण वाजवत नसत. पुष्कळ गाण्यांची नुसती ध्रुवपदे वाजवत. काहींचे एकेक कडवे ऐकवत आणि मला वाटते त्या त्या कार्यक्रमात 'सरताज' होणारे जे गाणे असेल ते मात्र संपूर्ण ऐकवीत असत.
कहानी किस्मतकी या सिनेमातले किशोरकुमार (आणि रेखा) यांनी म्हटलेले 'अरे रफ्ता रफ्ता देखो आँख मेरी लडी है...' हे गाणे त्या वेळी लोकप्रियतेच्या स्पर्धेत होते. ह्या गाण्यात दर कडव्याचा शेवट 'बात भी है ये असली... ' असा होतो. गाण्याच्या शेवटी ह्यालाच यमक साधून 'पांडोबा, पोरगी फसली हो फसली! ' असे शब्द आहेत आणि नंतर लगेच "... जवळ ये लाजू नको" अशी ओळ दोन तीनदा घेतलेली आहे.
ज्या दिवशी हे गाणे बिनाका गीतमालेत सरताज झाले, त्या दिवशी ते संपूर्ण ऐकवले गेले. त्यामुळे शेवटची "जवळ ये लाजू नको! " ही ओळही ऐकवली गेलीच! नाही का?
हो; पण एवढ्यावरच ही गोष्ट संपत नाही.
'कहानी किस्मतकी'मधले ते गाणे संपल्यावर अमीन सयानींनी "आता मूळ गाण्यातली हीच ओळ जयवंत कुलकर्णी ह्यांच्या आवाजात ऐका" असे म्हणून 'एकटा जीव सदाशिव' मधल्या त्या सुप्रसिद्ध गाण्याची ओळही ऐकवली,
"ये! जवळ ये लाजू नको!"
(असा प्रसंग आणखी मराठी गाण्यांच्या बाबतीतही घडला असल्यास कल्पना नाही.)