माझी मते देत आहे. कृपया गैरसमज नसावा.
डोळ्यांत आसवांचे, सजणेच नाही उरले, -
जगण्यांत 'हाय' आंता, जगणेच नाही उरले. - दोन ओळींचा संबंध वाटत नाही. आसवांचे सजणे उरले नसणे याचे कारण / अर्धा भाग / अर्थ, असे काहीच दुसऱ्या ओळीत नाही. दुसरी ओळ स्वतंत्र अर्थाची आहे. कोणत्याही शेरातील व प्रामुख्याने मतल्यातील दोन्ही ओळी अत्यंत घट्टपणे एकमेकांशी जोडल्या जायला हव्यात. 'हाय' हा शब्द तीव्रता वाढवण्याव्यतिरिक्त काही करत नाही असे माझे मत.
आनंदकंद या वृत्तात बसवण्यासाठी सर्वत्र 'नाही' या शब्दामधील 'हि' ऱ्हस्व हवा. मात्र सर्वत्र तो दीर्घच घेतला तर ते आनंदकंद होणार नाही इतकेच. मात्र लयीत म्हणता आले मात्र पाहिजे. 'ही' दीर्घ घेऊन लयीत म्हणणे अवघड जात आहे.
अंधार जाहला अन विकला प्रकाश त्यांनी,
स्वप्ने उजाडण्याची, बघणेच नाही उरले. - चांगल्या आशयाचा शेर! विशेषतः एखादा थोर माणूस निवर्तल्यानंतर त्याचे अनुयायी लोभाने समाजाकडून फायदा उकळतात असे काहीतरी जाणवले. तसेच, विकलेला खोटा प्रकाशच इतका प्रभावी होता की उजाडण्याची स्वप्ने पाहावीत असे वाटलेच नाही. व्वा!
टाळून राजवाडे, पाऊस काल पडला,
निष्पाप पाखरांचे, घरटेंच नाही उरले. - हा शेर मला प्रभावीत वाटतो. माफ करा. तसेच, या शेरात जो शब्द काफियाच्या जागी आलेला आहे तो काफिया होऊ शकत नाही. मतल्यात आपण एकदा 'अणेच' (बघणेच, सजणेच, जगणेच) असे नक्की केल्यावर 'घरटेच' मधील 'अटेच' चालत नाही. हे दुःख मोरपंखी, ते दुःख राजवर्खी' किंवा 'राजपुत्रांची दिवाळी' असे भटसाहेबांचे काही शेर आहेत त्या शेरांची नकळत चाहूल आल्यासारखी वाटली. अर्थात, हे मत वैयक्तिक आहे. तसेच, राजवाडे टाळून पाऊस पडला याचा नेमका संबंध निष्पाप पाखरांशी आहे असे वाटले नाही. राजवाडे म्हंटल्यावर झोपडी असा उल्लेख जरा जास्त उचित असावा. 'निष्पाप झोपड्यांचे, उरणेच ना 'हि' उरले' असे काहीतरी मला सुचले.
झाला असा करार, कौरव नि पांडवांचा, - करार या शब्दातील 'र' च्या जागी गुरू अक्षर हवे आहे. शब्द किंवा ओळीचा भाग बदलावा लागेल. (झाला करार ऐसा, झाला करार आता वगैरे)
द्दुतात द्रौपदीचे, हरणेच नाही उरले. - कुमार यांनी सांगीतल्याप्रमाणे 'द्यू' आवश्यक
हा शेर आवडला. चांगले व वाईट लोक (किंवा प्रवृत्ती) आज एकमेकांमध्ये इतक्या मिसळल्या आहेत किंवा एकमेकांमुळे इतक्या प्रभावीत झालेल्या आहेत की एकंदरच सगळे वाईट झाले आहे. खास करून द्रौपदीला द्यूतात हरण्याची आता गरज नाही. तिच्या वस्त्रहरणासाठी पांडवही कदाचित तितकेच उत्सूक किंवा 'ओके' आहेत. आता कृष्णही येणार नाही हे पक्के ठाऊक असावे असे काहीतरी!
साऱ्यांच माणसांचे, आयुष्य पेटलेले,
सरणावरी कुणाचे, जळणेच नाही उरले.
छान शेर आहे.
बऱ्याचदा गझल व कविता यांच्या आशयातील प्रमुख फरक हा गझलेच्या शेराच्या दुसऱ्या ओळीच्या आशयात असंभव असे काही ऐकायला / वाचायला मिळणे! या दृष्टीने प्रकाश विकणे व द्रौपदी हे शेर तसे आहेत असे मला वाटते. इतर शेर सरळ आहेत असे वाटते. सरळ सरळ अर्थ घेऊन येणाऱ्या द्विपदींच्या समुहाला गझल म्हणण्यापेक्षा कविता का म्हणू नये असा माझा प्रामाणिक प्रश्न आहे. अनेक उत्तम गझलांमधील शेरांमध्ये सरळ अर्थही येतो. पण तो अर्थ, मुद्दा, मांडणी, प्रतिमा यात काही ना काही नावीन्य किंवा सशक्तपणे भिडणारे असे असते.
आपल्या या गझलेत मला एक गोष्ट फार आवडली. कवीला कोणताही गंड आहे असे अजिबात वाटत नाही. टीका असली तरी आंतरिक व्यथा स्पष्ट करण्याइतकेच तिचे काम आहे. टीका हे कोणत्याही शेराचे ध्येय नाही.
एक अवांतर मुद्दा! बहुतांशी गायल्या गेलेल्या गझला (उर्दू, मराठी) या प्रामुख्याने प्रेम व व्यथा या भावनांवर असतात हे सत्य आहे. आपली (आपली म्हणजे तुमची असे नाही, कवीला जर वाटले की आपली गझल ) गझल गाता यावी अशी व्हावी तर जाणीवपुर्वक बघावे लागत असावे. या दृष्टीकोनातून कौरव, पांडव हा शेर सोडला तर आपली वरील गझल माझ्यामते गाण्यालायक आहे.
बाकी - माझ्यामते मराठी गझलेने आता 'सरण, जळणे, आसवे, हुंदके' यांना थोडेसे तरी नियंत्रणात आणून किंचित विनोदाची झालर, या युगातील संस्कृतीतील बदल वगैरे समाविष्ट करावेत.
मतला - गझलकारासाठी माझ्यामते हा एक बऱ्यापैकी भीषण प्रकार आहे. अनेक गाजलेल्या गझलांमध्येही मतल्यातील दोन्ही ओळी अर्थपूर्ण असूनही त्यांच्यात आशयाचा समारोप होताना दिसत नाही. त्या स्वतंत्रपणे परिस्थिती वर्णन करत बसतात. अनेकदा मतला 'सुचवत सुचवत' बसावा लागतो. काही वेळा मतलाच सुरुवातील सुचू शकेल. पण मला असे वाटते की जर मूळ सुचलेला विचार मतल्यात गुंफला तर पुढील शेर रचणे जरा सुलभ जावे. मात्र आपण सुचलेली एखादी ओळ जर पुढच्या एखाद्या शेरात गुंफली तर मात्र मतला रचताना स्वतःला जाब विचारावा असे मी समजतो. उदाहरणार्थ, आपल्याला समजा 'विकला प्रकाश त्यांनी' हे सर्वात आधी सुचले असेल तर तो मुद्दा मतल्यात मांडता येईल का असे बघावे असे मला वाटते. पण हा काही नियम किंवा कायदा असू शकत नाही. हे फक्त मत आहे.
ही सर्व वैयक्तिक मते आहेत. एवढी बडबड करूनही स्वतःच्या 'गझलांमधे'(? ) मी ती कितपत सिद्ध करतो हे ज्याचे त्याने ठरवावे.
कमी जास्त बोलले गेल्यास सोडून द्या.
धन्यवाद!