नटरंग हा चित्रपट मी काही दिवसांपूर्वी पाहिला. चित्रपट पाहात असतानाच हळूहळू अपेक्षाभंगाची भावना मनात दाटू लागली. आधी वाटलं की चित्रपटाच्या केलेल्या वारेमाप प्रसिद्धीमुळे माझ्याच अपेक्षा अवास्तव वाढल्या असाव्यात व म्हणून असे झाले असावे. त्यामुळे घाईत कुठेही प्रतिक्रिया नोंदवली नही. पण काही दिवस उलटून गेल्यानंतर, व शांतपणे विचार केल्यानंतरही मत न बदलल्यामुळे आता ते मांडत आहे. सुरुवातीलाच सांगतो की ज्यावर नटरंग आधारित आहे ती मूळ कादंबरी मी वाचलेली नाही, त्यामुळे माझी मते केवळ चित्रपटाविषयी व त्यात जाणवलेल्या त्रुटींविषयी आहेत.

पहिला मुद्दा गाण्यांचा. एक 'वाजले की बारा'चा अपवाद सोडल्यास, बाकीची गाणी ठीकच वाटली. जर ती झी मराठी वाहिनीने गेले ४-६ महिने सतत वाजवली नसती, 'हॅमर' केली नसती तर ती फारशी कोणाच्या खिजगणतीतही नसती. त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली अनेक गाणी मराठी चित्रपटांत व गैरफिल्मी आल्बम्समध्ये येऊनही प्रसिद्धीअभावी आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत. 'झी'चे आर्थिक पाठबळ व घरच्या वाहिन्या, ह्यामुळे नटरंगला खूप फायदा झालेला आहे. उदाहरण द्यायचं असल्यास 'वाजले की बारा' व 'अप्सरा आऽली' ह्या लावण्या 'दे धक्का'मधील 'उगवली शुक्राची चांदणी' पेक्षा शब्द, अर्थ, संगीत बाबत निश्चित डाव्या आहेत.

काही प्रसंग न पटण्यासारखे, अतार्किक वाटले. नयना ह्या पात्राला गुणा हा देखणा, पैलवान गडी दिसताक्षणीच आवडू लागलेला असतो हे शब्दांतून नसलं तरी तिच्या डोळ्यांतून, हावभावांतून, देहबोलीतून दिग्दर्शकाने सूचित केलेलं आहे. ती एक नैतिकतेची विशेष चाड नसलेली तमासगिरीण आहे हेही उघड आहे. ज्या मर्दानी, आकर्षक पुरुषाची तिला शारीर ओढ आहे त्याला ती कमावलेलं शरीर उतरवून नाच्या व्हायला सांगेल हे पटत नाही. बरं, तमाशात नाच्या हवाच ही तिचीच अट आहे, गुणा किंवा इतरांना त्याची गरज वाटत नसते. दुसरा कोणीही नाच्या होण्यास तयार नसल्यामुळे नाईलाजाने गुणा स्वतः नाच्या होण्याचा निर्णय घेतो. ह्या वेळी त्याच्यावर अनुरक्त असलेली नयना त्याला थांबवू शकते, आपला हट्ट सोडू शकते. अशा परिस्थितीत कोणतीही हाडामांसाची स्त्री तसेच करेल. पण नयना तसे करत नाही ही केवळ कादंबरीकाराची/दिग्दर्शकाची गरज असावी. ह्यात पात्राची अपरिहार्यता नाही.

शिंदे ह्या राजकारण्याकडून जत्रेतील कार्यक्रमाची सुपारी मिळवण्याचा प्रसंगही असाच अजब. सत्तास्थानी असलेल्या पुरुषाकडून आपलं काम करून घेण्यासाठी, त्याची विकेट घेण्यासाठी तमाशाचा व्यवस्थापक तमाशातील तारुण्यसंपन्न, नखरेल रूपगर्वितेला पुढे करेल की नाच्याला? शिंदे हा समलिंगी प्रवृत्तीचा असल्याची कोणतीही चिन्हं चित्रपटात नव्हती. मग त्याला पटवण्यासाठी, लाडे लाडे बोलण्यासाठी नयनाला ( किंवा दुसऱ्या एखाद्या मुलीला) पुढे करण्याऐवजी नाच्याला वापरण्याचे काय प्रयोजन?

गुणा दुसर्‍यांदा फड उभारायला निघाल्यानंतरच्या त्याच्या आयुष्याच्या प्रवासाची कहाणी तर दोन-चार मिनिटात चटावरचं श्राद्ध उरकावं तशी उरकली आहे. हा माणूस म्हातारपणी जीवन-गौरव पुरस्कार मिळवण्याइतपत मोठा कसा झाला हे प्रेक्षकांना कळतच नाही. मुळात, त्याआधी गुणाला लिहिताना, तालिमी घेताना जेव्हा जेव्हा दाखवले आहे तेव्हा त्याच्या वग-लेखनात अजिबात चमक दिसत नाही. हा पुढे जाऊन तमाशाच्या क्षेत्रातील दादू इंदुलीकर प्रभृती दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवेल, अशी पुसटशी शंकाही येत नाही. सुरुवातीला सगळेच कच्चे, नवशिके असतात हे मान्य पण अंगभूत प्रतिभा जरा तरी दिसायला नको? पैलू पाडण्याआधीही हिरा हिराच असतो, त्याच्यात व सामान्य दगडात काही फरक असतोच. पैलू पाडल्यानंतर तो अधिक चमकतो, सुंदर दिसतो इतकंच. गुणाच्या बाबतीत असे काही अजिबात वाटत नाही. इथे लेखक, पटकथाकार कमी पडले आहेत असे वाटते.

आपल्या अभिनयाच्या जोरावर नट-नट्यांनी दिग्दर्शकास व चित्रपटास तारून नेले आहे. अतुल कुलकर्णी ह्यांची अभिनयक्षमता वादातीत आहे, व ती त्यांनी ह्याआधीही सिद्ध केलेली आहे. त्यांनी ह्या चित्रपटात लौकिकास साजेसा अभिनय केलेला आहे, गुणाची दोन्ही रूपं जिवंत केलेली आहेत. मात्र खूप प्रयत्न करूनही अनेक ठिकाणी उच्चारात त्यांच्यातील 'कुलकर्णी' लपू शकलेला नाही. सोनाली कुलकर्णींनी अभिनय व नृत्य दोन्ही अप्रतिम केले आहे. नृत्य-दिग्दर्शिकेने बसवलेली नृत्यं खरं तर 'ठीक' पलीकडे फारशी जात नाहीत पण सोनाली कुलकर्णींनी त्यांतही प्राण फुंकून जिवंत केली आहेत. तिच्या पहिल्या प्रवेशात जत्रेत ती जो उत्स्फूर्त नाच करत असते तोच सर्वाधिक भावतो. 'अप्सरा आऽली' मधील काही झटके तर विजेचा झटका लागून झाल्यागत भासतात. अमृता खानविलकरचे 'वाजले की बारा' नाचापेक्षा गाण्यामुळेच गाजले. खानविलकरांना तो 'गेट-अप' फारसा शोभून दिसत नव्हता. त्यात त्यांच्या केशभूषेचा जो प्रकार केला तो पाहून शर्मिला टागोर ह्यांची आठवण झाली. डोक्याच्या मागच्या भागावर एखादा मोठा वाडगा उपडा ठेवून त्यावर एक भन्नाट टोप ठेवला असावा. गुणाची पत्नी झालेल्या नटीने (? विभावरी देशपांडे) आपली छोटी भूमिका परिणामकारकपणे वठवली आहे. किशोर कदम हा गुणी नट मात्र हळूहळू दिलीप कुमार, निळू फुले, नाना पाटेकर ह्यांचा कित्ता गिरवू लागला आहे हे पाहून वाईट वाटले. हे ताकदीचे नट जसे आपापल्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात बहुतेक चित्रपटांत (मोजके व सन्माननीय अपवाद वगळता) अनुक्रमे दिलीप कुमार, झेले अण्णा/निळू फुले, व नाना पाटेकरच असायचे त्याचप्रमाणे किशोर कदमही आता बहुतेक चित्रपटांत व दूरदर्शनवरील मालिकांमध्ये किशोर कदमच असतात. असे करून ते स्वतः:च्या अभिनयगुणांवर, प्रतिभेवर अन्याय करत आहेत ह्याचे दु:ख आहे. ज्याचा अभिनय मुळातच सुमार असेल त्याच्याबद्दल काय व कशाला तक्रार करायची? भारत भूषण सारख्या महान चित्रपटकर्मींनी (नट म्हणावयास जीभ रेटत नाही) संपूर्ण कारकीर्द चेहर्‍याची इस्त्री बिघडू न देता काढली ह्याबद्दल आम्ही तक्रार केली का? किंबहुना 'अभिनया'त कमालीचं सातत्य राखल्याबद्दल कुठेतरी त्यांचं कौतुकच वाटत राहिलं.

शेवटी राहून राहून मनात पुन्हा पहिलाच विचार येतो. जर ह्या चित्रपटाची एवढी अतिशयोक्त प्रसिद्धी केली गेली नसती तर मी इतक्या छिद्रान्वेषी नजरेने त्याकडे पाहिले असते का? नक्की माहीत नाही. कदाचित मी तो चित्रपट पाहिलाही नसता. पण पाहिला असता तर वर मांडलेल्यापेक्षा काही वेगळी प्रतिक्रिया असती असं नाही वाटत.